Sun, May 26, 2019 20:48होमपेज › Solapur › कुस्ती ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी : हिंदकेसरी दीनानाथ सिंग       

कुस्ती ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी : हिंदकेसरी दीनानाथ सिंग   

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:29PMलातूर : प्रतिनिधी        

कुस्ती ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे. आज लाल मातीतील कुस्ती लोप पावत चालली असून ती टिकावी, यासाठी कुस्तीवर सर्वांनी प्रेम करा, असे आवाहन  हिंद केसरी दीनानाथ सिंग यांनी लातूर जिल्ह्यातील रामेश्‍वर येथे केले.

 एकनाथ षष्ठीच्या औचित्यावर  रामेश्‍वर येथे  विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती-राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा-2018’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. विश्‍वनाथ. कराड होते. महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, रावसाहेब मगर, बापूसाहेब लोखंडे, नागनाथ देशमुख, गणेश कोहळे, भाजप नेते श्रीकांत देशमुख, नंदू विभुते, नसरूद्दीन नाईकवडी, तुळशीराम, कराड,  काशीराम  कराड,  प्रा. डॉ. मंगेश कराड, विलास कथुरे, रमेशअप्पा कराड, डॉ. सुनील कराड, राजेश कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीनानाथ सिंग म्हणाले, या स्पर्धेच्या माध्यमातून विश्‍वनाथ कराड यांनी ग्रामीण भागातील मल्लांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आहे. राज्यातील स्पर्धकांनी याचा लाभ घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव मोठे करावे.

भाजप नेते श्रीकांत देशमुख यांनी भविष्यात देशातील महत्त्वाची कुस्ती-स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला. प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी मनोगतातून कुस्तीची ही परंपरा टिकविण्यासाठी सर्वत्र अशा स्पर्धांच्या आयोजनाची गरज वर्तवली.  शुभारंभाची कुस्ती आकाश देशमुख आणि अनिल शेटे यांच्यात झाली. त्यामध्ये आकाश देशमुख विजयी झाला.  तसेच विक्रम शेठ आणि यशवंत काळे यांच्यातही अशीच कुस्ती झाली. यामध्ये विक्रम शेठ विजयी झाला. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो मल्लांनी सहभाग भाग घेतला होता. प्रा. गोविंद जाधव यांनी प्रास्ताविक केले.  विलास कथुरे यांनी आभार मानले.