Sun, Mar 24, 2019 10:36होमपेज › Solapur › लक्ष्मण ढोबळेंनी घेतले गडकरींचे आशीर्वाद 

लक्ष्मण ढोबळेंनी घेतले गडकरींचे आशीर्वाद 

Published On: Feb 13 2018 7:28PM | Last Updated: Feb 13 2018 7:28PM सोलापूर : प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आसुसलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही केला. ढोबळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना प्रवेशापासून दूर रहावे लागत आहे. 

मंगळवारी ढोबळे यांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने आता पुन्हा एकदा ढोबळे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साक्षीने ढोबळे भाजपच्या गोटात वावरत असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावली आहे. 

सोलापूर लोकसभेसाठी ढोबळे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात असताना मंगळवारी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. तर, गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. त्यानंतर  एका प्रकरणात न्यायालयात केसही सुरू आहे. त्यामुळे भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्याला तांत्रिक अडचण येत असल्याचे यापूर्वीच ढोबळे यांनी सांगितले होते. या अगोदरही ढोबळे फडणवीस यांना भेटले आहेत. शिवाय याच कारणासाठी ढोबळे यांनी दोनही देशमुख मंत्र्यांची भेटही घेतली आहे. ढोबळे यांना आगामी लोकसभा किंवा विधानसभा लढवायची आहे. मिळल ती संधी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली आहे.