Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Solapur › पंढरीत चार लाख भाविकांची मांदियाळी

पंढरीत चार लाख भाविकांची मांदियाळी

Published On: Jan 28 2018 10:16PM | Last Updated: Jan 28 2018 10:05PMपंढरपूर : प्रतिनिधी

माघी एकादशीनिमित्त पंढरीत सुमारे चार लाख भाविकांनी हरिनामाचा गजर करीत उपस्थिती लावली. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी पदस्पर्श व मुखदर्शन घेतले. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे पंढरीनगरी दुमदुमली आहे. यंदा माघी यात्रेला लक्षणीय गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

वर्षातील चार प्रमुख यात्रांपैकी माघी यात्रा एक मानली जाते.  माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची  महापूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याहस्ते, तर रुक्मिणीची महापूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्निक  करण्यात आली. यात्रेकरिता राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. नदीपात्रात  मुबलक वाहते पाणी असल्याने भाविक स्नान करून मुखदर्शन, त्याचबरोबर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी  जात होते.चंद्रभागेत स्नान, नगर प्रदक्षिणा, मुखदर्शन, मंदिराचे कळस दर्शन करून भाविक परत जात होते. दर्शन रांगेतही सुमारे 70 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली होती. 

चंद्रभागेच्या पैलतीरावर 65 एकर येथे लहान-मोठ्या दिंड्या, पालख्या यांच्या मुक्‍कामाची व्यवस्था करण्यात आल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. तंबू, राहुट्यांतूनही हरिनामाचा गजर सुरू असून प्रत्येक भाविक भजन, कीर्तन व प्रवचन रंगले आहे. मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 74 सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यांची नजर असल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत  सुरू आहे. दर्शन रांग रविवारी सकाळी पत्राशेडपर्यंत झाली होती. दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासामठी 10 ते 12 तासांचा कालावधी लागत आहे.