Sun, Mar 24, 2019 17:16होमपेज › Solapur › संतांच्या भूमीला कुणालने वीरभूमी बनविले

संतांच्या भूमीला कुणालने वीरभूमी बनविले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

साधू संतांच्या भूमीला शहीद मेजर कुणाल गोसावी यांनी वीरभूमी बनविले आहे. ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’ ही उक्‍ती कुणालने सार्थ ठरवली असल्याचे प्रतिपादन पुणे एनसीसीचे गु्रप कमांडर ब्रिगेडियर सुनील बोधे यांनी केले. 

बुधवार ( दि.29 रोजी) वाखरी ( ता.पंढरपूर) येथे शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रथम पुण्यस्मरण व शहीद स्मारक अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ब्रिगेडियर बोधे बोलत होते. यावेळी सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल सुहास जतकर, आ. भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक, निवृत्त कॅप्टन सुनील गोडबोले, कर्नल अलोक गिपाणे, कर्नल विकास कोल्हे, भागवताचार्य वा.ना. उत्पात, वीरपिता मुन्नागीर गोसावी, वीरमाता वृंदा गोसावी, वीरपत्नी उमा गोसावी, वाखरी सरपंच मथुराबाई मदने आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कुणालप्रेमी नागरिक उपस्थित होते. दरम्यान, यानिमित्ताने गोसावी परिवाराच्यावतीने राज्यभरातील वीरपत्नी, वीरपिता व वीरमाता यांचा स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. 

यावेळी निवृत्त कर्नल सुहास जतकर म्हणाले की, शहीद कुणाल गोसावी यांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्यानंतर देशासाठी शहीद होण्याची भिती युवकांना वाटणार नाही. सैन्यात भरती होत असताना गोसावी यांचा पैसा कमावणे हा हेतू नव्हता. कुणालच्या आई वडिलांनी ज्याप्रमाणे त्याला सैन्यात पाठविले. तसा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. भावी पिढीसाठी कुणाल यांचे स्मारक प्रेरणा देणारे आहे. अलोक त्रिपाठी यांनीही आपले विचार व्यक्‍त केले. 

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक वीरपिता मुन्नागीर गोसावी यांनी केले. आभार अविनाश गोसावी यांनी मानले. सूत्रसंचालन विक्रम विस्कीटे व सतीश बुवा यांनी केले. यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.