Fri, Jul 19, 2019 17:44



होमपेज › Solapur › ...अन्यथा वेगळा विचार करू : बळीरामकाका साठे

...अन्यथा वेगळा विचार करू : बळीरामकाका साठे

Published On: Jun 04 2018 11:55PM | Last Updated: Jun 04 2018 11:42PM



सोलापूर : प्रतिनिधी 

सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले असून नेतेमंडळींनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यामध्ये प्रभावी असलेले राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादीचे नेते बळीरामकाका साठे यांनी आपल्या गटाला आणि पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर समविचारी पक्षांशी आघाडी करू अन्यथा वेगळा विचार करू, अशी भूमिका घेतली आहे. 

बळीरामकाका साठे यांनी वडाळा, तालुका उत्तर सोलापूर येथे सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच काही कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत जाण्याची तयारी दर्शविली, तर काहींनी भाजपसोबत युती करण्याच्या भावना व्यक्‍त केल्या. मात्र सध्या पक्षाच्यादृष्टीने हा महत्त्वाचा काळ आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द अंतिम मानून काम करावे लागेल, अशी भूमिका काका साठे यांनी घेतली. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनाही लक्षात घ्या, असे अनेकांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर काँग्रेससोबत जावा आणि पहिल्यांदा जितेंद्र साठे यांना बाजार समितीचे चेअरमनपद मागा, असे अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी साठे यांना सुचविले.

मात्र काका साठे यांनी तालुक्यातील निम्म्या जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जाऊ अन्यथा वेगळा निर्णय घेऊ, असा विश्‍वास उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील सहा गणांपैकी तीन गणांवर काका साठे ठाम असून त्यामध्ये भरीस भर म्हणून ते पहिल्यांदाच चेअरमनपद मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आता काँग्रेस मान्य करणार की भाजप यावरच त्यांची   भूमिका स्पष्ट होणार आहे.  आपल्या गटाला काँग्रेस आणि भाजपकडूनही प्रस्ताव आहेत. मात्र शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानून काम करावे लागेल, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी भोगावच्या सरंपच वैशाली पाटील, युवक तालुकाध्यक्ष पांडुरंग नवगिरे, तानाजी पवार, शिवाजी नन्नवरे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र शिलवंत, गणेश पाटील, मैनोद्दीन पठाण यांच्यासह अनेक गावचे सरपंच, उपसरंपच तथा पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.