Mon, Sep 24, 2018 23:29



होमपेज › Solapur › कोपर्डीतील बहिणीच्या विवाहासाठी एकवटला सकल मराठा समाज

कोपर्डीतील बहिणीच्या विवाहासाठी एकवटला सकल मराठा समाज

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 09 2017 1:47AM

बुकमार्क करा





बीड : उत्तम हजारे

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी प्रकरणातील पीडित निर्भयाच्या बहिणीच्या विवाहासाठी सकल मराठा समाज सरसावला असून ती 11 डिसेंबर 2017 रोजी वाकी (ता. बारामती) येथील प्रशांत जगताप पाटील यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. फलटण येथे होणार्‍या या विवाहसोहळ्यास राष्ट्रसंत भैय्युजी महाराज, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक संत-महंत व राज्यभरातून मराठी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता.कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. कोपर्डीतील निर्भयावर अत्याचार करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघाले होते. अनेक ठिकाणी प्रतीक्रांती मोर्चे निघाल्याने, या प्रकरणास जातीय वळण मिळाले होते. महाराष्ट्राबाहेरही या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. कोपर्डी प्रकरणातील तीन आरोपींना नगरच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते.

कोपर्डीतील निर्भयाच्या मोठ्या बहिणीच्या विवाहासाठी सकल मराठा समाज एकवटला असून, राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. वाकी (ता. बारामती) येथील श्रीरंग निवृत्ती जगताप यांचे द्वितीय चिरंजीव प्रशांत यांच्याशी दीपालीचा विवाह 11 डिसेंबर रोजी माऊली गार्डन, खुंठे (ता. फलटण, जि. सातारा) येथे होत आहे. या विवाह सोहळ्यास राष्ट्रसंत भैय्युजी महाराज, खा. उदयनराजे भोसले, ब्रह्मचैतन्य आत्माराम बाबा, गोविंद महाराज शिंदे, दादा महाराज, काका महाराज, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजय भोर-पाटील, छावाचे पुणे जिल्हाध्यक्ष आबा पाटील, बापुसाहेब गुंड, बाळासाहेब जगताप, विजय पवार, सुभाष पाचारणे, अर्जुन तपकीर आदींसह अनेक संत-महंत व राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

नारीशक्तीचा सन्मान

पत्रिकेच्या मध्यभागी एका महिलेचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले असून, नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला आहे.