Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Solapur › कोंढेज खून प्रकरणात पतीच ठरला आरोपी

कोंढेज खून प्रकरणात पतीच ठरला आरोपी

Published On: Mar 10 2018 10:37PM | Last Updated: Mar 10 2018 10:24PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

कोंढेज (ता. करमाळा) येथे गळा दाबून खून करून पोत्यात बांधून मृतदेह विहिरीत टाकलेल्या अज्ञात महिलेच्या खुन्यापर्यंत पोहोचण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. संबंधित महिलेच्या पतीनेच खून केल्याची कबुली दिली आहे.

चंद्रकांत शिवाजी काबंळे (वय 28, मूळ रा. सोड्डी, ता. मंगळवेढा, हल्ली रा. निवर्गी, ता. इंडी) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनिता चंद्रकांत काबंळे (वय 34) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सपोनि प्रकाश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून 72 तासांत या खुनाचा छडा लावला आहे.

माहिती अशी की, सोमवार, 5 मार्च रोजी कोंढेज येथे अज्ञात महिलेचा गळा दाबून खून करून मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या खुनाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून तपास सुरू केला. सपोनि प्रकाश वाघमारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक कल्याण ढवणे, प्रवीण साठे, योगेश चितळे, रवींद्र गोंधे, सागर शेंडगे, नितीन माने यांचा पथकात समावेश होता. 

मृतदेहाच्या गळ्यात काळे मणी असलेले मंगळसूत्र, तर अंगात स्वेटर आणि पायात पैंजण आढळले होते. ज्या पद्धतीने तिला गोणीत बांधून  पाण्यात टाकले होते त्यानुसार हा खूनच असल्याचा संशय होता. घटनेनंतर प्रथम कोंढेज शिवारात याचा तपास करण्यात आला. हरवलेल्या व्यक्तींची पडताळणी करण्यात आली. घटनेच्या जवळील वस्तीवर चौकशी करण्यात येऊन संभाव्य आरोपी निश्‍चित करण्यात आला होता. तो आरोपी कुटुंबासह राहात आसल्याने तशी चके्र फिरवण्यात आली. प्रथम साडे नंतर वडापुरी (ता.इंदापूर), नंतर कर्नाटक येथील निवर्गी, नंतर पंढरपुर तालुक्यातील सरकोली व पुन्हा वडापुरी येथे सापळा रचून एका हॉटेलमध्ये आरोपीला पकडण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. आरोपी हा मृत महिलेचा पती होता. त्याने खुनाची कबुली दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे हे करीत आहेत.