होमपेज › Solapur › उचलपोटी ऊसतोड कामगाराचे अपहरण

उचलपोटी ऊसतोड कामगाराचे अपहरण

Published On: May 28 2018 1:31AM | Last Updated: May 27 2018 9:54PMअक्‍कलकोट : वार्ताहर

ऊसतोडणीसाठी टोळींना आगाऊ उचल म्हणून दिलेल्या 50 हजार रुपयांच्या वसुलीसाठी एकास अपहरण केल्याप्रकरणी उत्तर पोलिस ठाणे येथे तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 21 मे 2018 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान हन्नूर-चुंगी रस्त्यावर घडली आहे. 

अधिक माहिती अशी की, पीडित गिरेप्पा जगन्नाथ तिघाडे (रा. किणी) यास मनोहर पात्रे यांनी नेहमीप्रमाणे ऊसतोडणीसाठी येणेकामी आगाऊ म्हणून 50 हजार रुपये दिले होते. मात्र गिरेप्पा हा न आल्याने आरोपी मनोहर पात्रे यांनी सोबतीला यल्लप्पा पात्रे, लक्ष्मण पात्रे (रा. निरगुडी, ता. आळंद, जि. कलबुर्गी), शिवाजी गौरु बंदिछोडे (किणी, ता. अक्‍कलकोट) यांना घेऊन सोमवार, 21 मे 2018 रोजी गिरेप्पा यांनी अक्‍कलकोट येथील आठवडा बाजार करुन परत किणीकडे जात असताना दरम्यान  हन्नूर ते चुंगी रस्त्यावर गिरेप्पा याला अडवून मोटारसायकलसह जगन्नाथला जीपमध्ये बसवून अपहरण केले होते.

त्यानंतर तीन दिवसांनी गिरेप्पा यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती मिळाली. त्यावरुन गिरेप्पा यांचे वडील जगन्नाथ तिघाडे यांनी उत्तर पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली. त्यावरुन ऊसतोडणीसाठी दिलेली 50 हजारांची उचल वसुलीसाठी किणी येथील एकाचे अपहरण केलेल्या चौघांना अक्‍कलकोट दक्षिण पोलिसांनी आठ तासांत पकडले. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. गिरेप्पा जगन्नाथ तिघाडे (वय 35) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, हेडकॉन्स्टेबल नागा कुंभार, धनराज राठोड, दगडू पठाडे, रियाज मुल्ला, सीताराम राऊत यांनी सदर आरोपीस पकडण्यासाठी रवाना झाले असता केवळ आठ तासात आरोपींना शोधून अटक केली. त्यानंतर अक्‍कलकोट कोर्टासमोर शुक्रवार, 25 मे रोजी उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर आरोपींना सोमवार, 28 मे रोजी पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास सपोनि दीपक जाधव हे करीत आहेत.