Sun, Jan 19, 2020 15:52होमपेज › Solapur › अपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी

अपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

करमाळा : तालुका प्रतिनिधी

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. सुनील सोमनाथ वाघमोडे, (वय 19, रा. सरपडोह ता. करमाळा) असे पोलिस कोठडी ठोठावलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बसस्थानक रस्त्यावरील महावितरण कार्यालयाजवळ हा प्रकार घडला होता. अल्पवयीन पीडित मुलगी शाळेत जात असताना मोटारसायकल क्रमांक (एम.एच.13 यु. 5341) यावरून आलेल्या दोघांनी बसस्थानकाजवळ वीजवितरण कार्यालयासमोर पीडित मुलीला अडवले व जबरदस्तीने मोटारसायकलवर उचलून बसवले व औद्योगिक वसाहतीच्या दिशेने मौलाली माळ रस्त्यावर वेगाने पळवून नेले.  संशयित  आरोपीने पीडित मुलीसह मोटारसायकलवर बसून लज्जा वाटेल, असे वर्तन केले. यावेळी मुलीने आरडाओरड करू नये, म्हणून मुलीचे तोंडही दाबून धरले. मात्र मोटारसायकल उपजिल्हा रुग्णालयासमोर आली असता पीडित मुलीने जिवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या आरडाओरडीमुळे ती मोटारसायकलवरून झटापट करत खाली उतरली. मुलीच्या  ओळखीच्या व्यक्‍तीने त्यातील मागे बसलेल्या आरोपीस पकडले व त्याला नाव विचारले. त्यावेळी सुनील वाघमोडे असे नाव सांगितले होते, तर गाडीवरील दुसरा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला होता. सुनील वाघमोडे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.