सोलापूर : प्रतिनिधी
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या 28 व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्टस् कंट्रोल बोर्डने, तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांमध्ये महाराष्ट्र संघाने तब्बल 41 वर्षांत प्रथमच वरिष्ठ गट स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.
मंगळवारी दुपारी झालेल्या मुलांच्या सांघिक सायबर प्रकारातील अंतिम सामन्यात एसएससीबी संघाने जम्मू-काश्मीर संघावर 45-30 गुणाने मात करत विजय संपादन केला.
मुलांमध्ये 30 गुणासह एसएससीबी संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्यानंतर 15 गुणासह राजस्थान द्वितीय आणि 8 गुणासह महाराष्ट्र राज्याने तिसरा क्रमांक पटकावला. भारतात 1974 साली तलवारबाजी खेळाला सुरुवात झाली.तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच तब्बल 41 वर्षांत महाराष्ट्राला वरिष्ठ गटाचे विजेतेपद मिळाले नव्हते. सोलापुरात झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक तिसरा क्रमांक मिळवून प्रथमच विजेतेपद पटकावले असल्याचे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार अशोक दुधारे यांनी सांगितले. प्रशिक्षण केंद्राच्या पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांच्या हस्ते विजेत्या संघांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी तसेच मेडल देऊन सन्मानित करण्यात आलेे. मुलींमध्ये 30 गुणासह केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 17 गुणासह पंजाब राज्याने द्वितीय, तर 14 गुणासह मणिपूर राज्याने तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश काटुळे, सचिव डॉ.उदय डोंगरे, सिंहगडचे उपप्राचार्य प्रकाश नवले, राजेंद्र माने, सुहास छंचुरे, प्रा. रविंद्र देशमुख, प्रा. करीम मुजावर आदी उपस्थित होते.