Sat, Jul 20, 2019 08:42होमपेज › Solapur › केरळसोबत केंद्राचा दुजाभाव!

केरळसोबत केंद्राचा दुजाभाव!

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:45PMसोलापूर : प्रतिनिधी

ज्या ज्या राज्यांत विरोधी पक्षाची सरकारे आहेत त्या राज्यांना निधी देण्याबाबत केंद्रातील भाजप सरकार हे दुजाभाव करीत आहे. केरळमध्ये आलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तेथील राज्य सरकारने केंद्राकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात मात्र केवळ पाचशे कोटी रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आल्याने त्यांच्याकडून दुजाभाव झाल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी सोलापुरात केला. 

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या प्रतिमेस शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रनिर्मिती करत असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र त्यांची वागणूक वेगळी आहे. केरळमध्ये आलेल्या महाभयंकर पुरामुळे येथील नागरिकांना मदतीची गरज आहे. अशापरिस्थितीत राजकारण बाजूला सारून मदत होणे अपेक्षित असते. केरळ सरकाने मोदी यांच्याकडे दोन हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली असताना त्यांच्याकडून प्रत्यक्षात केवळ पाचशे कोटी रुपयांचीच मदत देण्यात आल्याने त्यांच्या या वागण्याला काय म्हणावे तर काय, असा प्रश्‍न शिंदे यांनीच उपस्थित केला. सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी मागील निवडणुकीत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बाहेर पडलेले हे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असतील तर त्यांना काँग्रेसचे दार उघडे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येकासाठी काँग्रेस पक्षाचे दार नेहमी उघडे असते, असेही शिंदे म्हणाले. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे सोनिया गांधी यांच्यासमवेत सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या वैशिष्ट्याचे कौतुक केले होते. असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी स्व. राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला.