होमपेज › Solapur › काँग्रेसमध्ये सन्नाटा तर भाजपात चलबिचल 

काँग्रेसमध्ये सन्नाटा तर भाजपात चलबिचल 

Published On: May 15 2018 10:52PM | Last Updated: May 15 2018 10:52PMसोलापूर : प्रतिनिधी

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालात जनतेने भाजपला बहुमताच्या उंबरठ्यावर आणून सोडले, मात्र स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यालयात सन्नाटा, तर भाजप कार्यालयात चलबिचल, असे चित्र सायंकाळपर्यंत दिसून आले. 

मंगळवारी सकाळी आठपासून निकालास सुरुवात झाली. पहिली जागा काँग्रेसने घेत मतमोजणीस सुरुवात झाल्याचे वृत्त वाहिन्यांवर येत होते. 
तसेच काही काळ जाताच भाजपने पुढे सरशी मारल्याचे वृत्त आले. त्यानंतर काँग्रेस 68, तर भाजप 74 असे चित्र दिसले. भाजपने शंभराचा आकडा पार केला. काँग्रेस 70-75 च्या पुढे जाऊच शकले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यालयात सकाळपासूनच सन्नाटा दिसून आला. हा सन्नाटा शेवटपर्यंत टिकून होता. सोलापूर हा कर्नाटकच्या सीमेवरील जिल्हा असल्याने काँगे्रसच्या बड्या नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकून काँग्रेसचा प्रचार केला होता. काँग्रेसला आपली सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान होते.  त्यामुळे या निकालाकडे त्यांच्यासह अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. 

मात्र चाणाक्ष कर्नाटकातील जनतेने आपला इतिहास कायम ठेवत पहिल्या सरकारला परत संधी न देणे हा कित्ता कायम ठेवत काँग्रेसला नाकारत भाजपच्या पारड्यात मते टाकली. 
शंभराचा आकडा पार केल्यानंतर राजवाडे चौकातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मनपा सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक किरण देशमुख, इतर नगरसेवकांनी जल्लोष केला. पेढे वाटून आनंद साजरा केला. दुपारी साडेतीन वाजता सिव्हिल चौकातील भाजप कार्यालयासमोर जल्लोष करण्याचे ठरले. मात्र सायंकाळपर्यंत भाजप बहुमताचा आकडा पार करू शकले नाही. त्यात काँग्रेस, जेडीयू एकत्रित येऊन सत्ता स्थापन करतील, असे वृत्त येऊन धडकू लागले. तर काँग्रेसचा आकडा वाढत 78 वर गेला. अशात आनंदोत्सव, जल्लोष करावा की नको म्हणून भाजपत चलबिचल चालू झाली. सत्ता स्थापण्यात पक्ष कमी पडला. त्रिशंकूचा फायदा घेत काँग्रेस-जेडीयूने सत्ता स्थापन केली तर, यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल दिसून येत होती. विजयाची खात्री नसताना जल्लोष केला आणि यातून अपरिपक्‍वतेचा शिक्‍का बसू नये म्हणून पक्षात चलबिचल दिसून येत होती.  जो तो टीव्हीसमोर बसून होता. अशात सायंकाळी पाच वाजता आपण सत्ता स्थापन करणार, असा विश्‍वास व्यक्‍त करीत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.     

यावेळी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नू, सरचिटणीस दत्ता गणपा, हेमंत पिंगळे, इंद्रजित पवार, रामप्पा चिवडशेट्टी, काशिनाथ कदम, नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, संगीता जाधव, मनिषा हुच्चे, अश्‍विनी चव्हाण, श्रीनिवास करली, अविनाश बोमड्याल, कोषाध्यक्ष श्रीनिवास दायमा, दैदिप्य वडापूरकर, उपाध्यक्ष मधुकर वडनाल, शोभा नष्टे, गणेश चिवटे, सुनील गुंड, विजय इप्पाकायल, नारायण जाधव, रवि नादरगी, कामगार अध्यक्ष नागेश पासकंटी, सुकुमार सिध्दम, व्यंकटेश कोंडी, रवि भवानी, शीलरत्न गायकवाड, सरपंच सिद्धाराम हेले, श्रीनिवास पुरूड, डॉ. रफिक सय्यद, प्रभाकर गणपा, मल्लेशम सरगम, अ‍ॅड. मंजुनाथ कक्‍कळमेली, अनंत गोडलोलू, सुनील साळुंखे, संभाजी दडले, महेश देवकर, बाबुभाई मेहता, श्रीनिवास अगनूर, वीरभद्रेश बसवंती, विठ्ठल वनस्कर, राहुल कांबळे,  कार्यालय प्रमुख सुनील टोणपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासाला मत, जनतेचे आभार : जिल्हाध्यक्ष पवार 
भाजपाचे यश हे कार्यकर्त्यांचे आहे. मोदींच्या विकासाला जनतेने मते दिली. काँग्रेसच्या जातीय राजकारणाला लोकांनी नाकारले. देश बदलत आहे, अच्छे दिन येत आहेत, हे लोकांनी मान्य करुन मोदींना साथ दिली. जनतेमध्ये मोदींची लाट आणखी कायम आहे. जनतेने भाजपला पहिली पसंती दिली असून जनतेचे आभार मानत असल्याचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सांगितले. 

भ्रष्ट सरकारला जनतेने नाकारले : शहराध्यक्ष निंबर्गी 
कर्नाटकातील काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारला जनतेने नाकारले असून देश काँग्रेसमुक्‍त करण्यासाठी जनतेने साथ दिली आहे. देशातील हे महत्त्वाचे राज्य आहे. जनतेने भाजप अर्थात विकासाला मतदान करून खंबीर साथ दिली आहे. कर्नाटकात भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्‍वास भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी व्यक्‍त केला.