Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Solapur › उंदरगावात बिबट्या जेरबंद

उंदरगावात बिबट्या जेरबंद

Published On: Aug 26 2018 10:29PM | Last Updated: Aug 26 2018 10:23PM करमाळा : तालुका प्रतिनिधी 

गेल्या दोन महिन्यांपासून उंदरगाव, पारेवाडी, केत्तूर व वाशिंबे परिसरात उच्छाद मांडणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. या बिबट्याच्या जेरबंद होण्याने या परिसरातील शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. मात्र, अद्याप बिबट्याची मादी व दोन पिल्लांचा उजनी व उंदरगाव परिसरात वावर असल्याचे बोलले जात असल्याने शेतकरी अजूनही चिंताग्रस्त आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपूर्वी मांजरगाव येथील तालमीतून मुलांना घेऊन कोकरे वस्तीकडे परतणार्‍या कैलास कोकरे या तरुणाला रस्त्याच्या कडेला बिबट्या पहुडला असल्याचे दिसले होते. यावेळी दुचाकी थांबवून मोटारसायकलच्या प्रकाशझोतात त्याला पाहिले असता तो बिबट्या असल्याचे लक्षात येताच त्याची भीतीने गाळण उडाली होती. त्यांनी तसेच वस्तीवर धाव घेऊन पोलिस व करमाळ्यातील वन विभागाला याची माहिती दिली होती. यानंतर वन विभागाचे मोहोळ परिमंडळ अधिकारी जयश्री पवार, सोलापूर विभागाचे वनरक्षक सुरेश कुरले, वनपाल विठ्ठल खारतोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याच्या पायाचे ठसे व इतर खुणा पाहून त्याला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे लावले होते. 

दरम्यान, उजनी परिसरात दररोज बिबट्या पाहिल्याची आरोळी सुरू झाली. सतत अफवा येत असल्याने व प्रत्यक्षात बिबट्या दिसत नसल्याने तो प्राणी बिबट्या नसावा, अशी वनविभागाची धारणा झाली होती. मात्र वनविभागाचे वनमजूर विकास वाघमोडे, नारायण चव्हाण, शिवाजी दळवी, पिंपरकर, मोटे आदी कर्मचार्‍यांनी चार-पाच ठिकाणी जागा बदलून पिंजरे लावले. मात्र बिबट्या काही हाती लागला नाही. गेल्या आठवड्यात वीट परिसरात कॅॅनॉल पट्टीवर बिबट्या दिसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी जाधव वस्तीवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी व माळी वस्तीवर एक पिंजरा लावण्यात आला. या पिंजर्‍यात एक शेळीचे करडू बांधण्यात आले. रात्रीच्या वेळी करडू एकटे असल्याने ते रात्रभर ओरडत राहिले. रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास त्या परिसरात फिरत असणार्‍या भुकेल्या बिबट्याने आवाजाच्या दिशेने जात त्या करडूला पकडण्यासाठी पिंजर्‍यात प्रवेश केला आणि तो त्यात  अडकला.

यावेळी बिबट्याच्या ओरडण्याच्या आवाजाने शेतकरी चंद्रकांत कुंभार यांनी रात्रीच काही शेतकर्‍यांना घेऊन घटनास्थळ गाठले. त्यांना बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे लक्षात आले. 
 त्यांनी वाशिंबे येथील पेट्रोलपंपावर मुक्‍कामास असलेले वनमजूर शिवाजी दळवी, चव्हाण यांना समक्ष सांगितले. तसेच उंदरगावचे पोलिस पाटील रेवणनाथ निकत, सरपंच हनुमंत नाळे, विजय निकत यांना याची कल्पना दिली. सकाळी ही माहिती पंचक्रोशीत समजताच शेकडोंच्या संख्येने शेतकरी व युवावर्ग घटनास्थळी धावला. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी विठ्ठल खारतोडे, सुरेश कुरले, पोलिस अधिकारी सोमनाथ कोळी, प्रदीप पर्वते आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंजर्‍यासह बिबट्याला वाहनातून पुण्याकडे नेण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सरपंच हनुमंत नाळे, राम कांबळे, हनुमंत निकत, कैलास कोकरे,  योगेश कुंभार, योगेश ताकमोगे, युवराज मगर, अशोक जगताप, अनिल मोहोळकर, सुनील कोकरे, शरद मगर आदींनी व उंदरगाव व परिसरातील शेतकर्‍यांनी सहकार्य केले.