Mon, Jun 17, 2019 03:01होमपेज › Solapur › करमाळा तालुक्यात पुन्हा चोर्‍यांचे सत्र

करमाळा तालुक्यात पुन्हा चोर्‍यांचे सत्र

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 10:09PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात घरफोडी व इतर भुरट्या चोर्‍यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. शेटफळ व शेलगाव येथे पुन्हा चोरीच्या घटना घडल्या आहेत.शहर व तालुक्यात चोरीचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. सलग तीन दिवस चोर्‍या झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. यातील पहिला चोरीचा प्रकार शेटफळ येथे मंगळवारी घडला. या घटनेत सुनील पोळ (वय 55) यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून घरातील कपाटाच्या कप्प्यात ठेवलेले 1 लाख 50 हजार 300 रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले आहेत. पोळ यांनी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील सोन्याचे गंठण, मणी, नाकातील नथ, कानातील गुंड, पायातील जोडवी असे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे हे करत आहेत.

करमाळा बसस्थानकात प्रवाशाची चोरी झाली. या चोरीच्या प्रकारात तालुक्यातील आळजापूर येथील भारती रोडे (वय 22) यांच्याकडील सोन्याचा नेकलेस व सोन्याचे गंठण असा एकूण 27 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक टबाले हे करत आहेत.

शेलगाव वीराचे येथे दोन ठिकाणी चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामध्ये दोन्ही घरातील मिळून 63 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरी गेलेल्या ऐवजामध्ये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. सदर घटनांमध्ये दत्तात्रय काळे आणि सीताराम शिंदे यांच्या घरी चोरीचा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणात दत्तात्रय काळे (वय 40) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. रात्री त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, कर्णफुले, झुबे व दोन हजार रुपये रोख रकम असा एकूण 38 हजार रुपयांचा, तर गावातीलच सीताराम शिंदे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून 25 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.

या चोरीवेळी अज्ञात चोरट्यांनी ठकुबाई शिंदे (वय 65) या वृध्द महिलेला झोडपून काढले व जखमी केले. तिच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, चोरीवेळी वृध्देच्या आरडाओरडीने परिसरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. 

याची खबर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश प्रसाद भरते हे पोलिसांसह दाखल झाले. यामध्ये ग्रामसुरक्षा दलाचे राहुल कुकडे, संदीप पाटील, वैभव वीर यांनी शेलगाव, सौंदे, निंभोंरे परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र चोरटे हाती लागले नाहीत. नागरिकांनी सतर्क राहून गस्त घालावी व एकजूट ठेऊन अनोळखी व संशयास्पद व्यक्तीबाबत पोलिसांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश देवरे यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सपोनि गणेशप्रसाद भरते हे करत आहेत.