Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Solapur › शेलगावचा विजय गुटाळ मुंबई महापौर केसरीचा मानकरी

शेलगावचा विजय गुटाळ मुंबई महापौर केसरीचा मानकरी

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:24PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

शेलगाव, तालुका करमाळा येथील प्रसिध्द मल्ल विजय गुटाळ याने मुंबईच्या महापौर केसरी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत कोल्हापुरच्या मल्लाला अखेरपर्यंत झुंजवून महापौर केसरीवर आपले नाव कोरले आहे.

मुंबई येथे पार पडलेल्या मुंबई ‘महापौर केसरी’ किताबाच्या कुस्ती स्पर्धेत  सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील भाळवणी गावाचा सुपुत्र पै. विजय गुटाळ अजिंक्यवीर ठरला आहे. त्याने बलाढ्य प्रतिस्पर्धी सचिन जामदार याला पराभूत करण्यापूर्वी  एकूण 6 फेरीतील पैलवानाशी लढावे लागले होते. अखेर कोल्हापूरचा सचिन जामदार विरूध्द विजय गुटाळ अशी अंतिम लढत झाली. यात विजय गुटाळ याने आक्रमक खेळ करत संपूर्ण स्पर्धेत आघाडी घेतली. अखेर पंचांनी 15-4 गुणांनी गुटाळ याला विजयी घोषित केले. पै. गुटाळ याने विजय मिळवत मुंबई महापौर केसरी किताबावर अखेर आपले नाव कोरले. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पैलवान आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केसरी किताब व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवणे हेच ध्येय असल्याची प्रतिक्रिया या विजयानंतर पै. विजय गुटाळ यांने दिली आहे. यापूर्वी पैलवान गुटाळ यांने राष्ट्रवादी केसरी, ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक आदी गावागावातील फडातूनही अनेक किताब मिळवलेले आहेत.
सध्या पैलवान गुटाळ हे गंगावेस तालीम कोल्हापूर येथे वस्ताद विश्‍वास हारगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

त्याच्या या विजयाबद्दल आमदार नारायण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील, डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील, राजन पाटील, सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, महाराष्ट्र चॅपियन दत्ता सरडे, खरात वस्ताद, मुबारक शेख, सुलेमान मुल्ला, आदम शेख, सुनील तळेकर, संतोष वाघमोडे आदींनी अभिनंदन केले आहे.