होमपेज › Solapur › जेऊर ग्रामस्थांचे प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण 

जेऊर ग्रामस्थांचे प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण 

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:28PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी 

जेऊर येथील गाळ्याचे व गावातील अतिक्रमण काढण्याचे गटविकास अधिकार्‍यांनी दिलेले आश्‍वासन न पाळल्याने प्रजासत्ताक दिनी पुन्हा या मागणीसाठी ग्रामस्थांनी चालू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही चालूच होते. 

मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, रामभाऊ पवार, नगरसेवक  सचिन घोलप, माजी सरपंच संतोष वारे, सुनील लोखंडे, विजय लावंड आदींनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गटविकास अधिकार्‍यांकडे नियमानुसार मात्र तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली व चार-चार दिवस उपोषणकर्त्यांना तंगवून त्यांना न्याय देण्यास विलंब का केला जातो, असा सवाल दिग्विजय बागल यांनी उपस्थित केला आहे.

सलग चौथ्या दिवशी हे उपोषण चालू असून तिघा जणांपैकी दोघांची प्रकृती खालावली असून पंचायत समितीसमोर चालू असलेल्या उपोषणामध्ये बालाजी चंद्रकांत गावडे, बाळासाहेब एकनाथ कर्चे, देवानंद महादेव पाटील यांचा समावेश आहे.

जेऊर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोंढेज रस्त्यावर सार्वजनिक विहिरीजवळील गाळ्यांचे अतिक्रमण काढून टाकावे या संदर्भात चालू केलेले ग्रामस्थांचे 15 ऑगस्ट 17 चे उपोषण गटविकास अधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. जेऊर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमणाच्या जागेत गाळे बांधण्याचे काम चालू होते. यामुळे या भागातील लक्ष्मीआई देवी मंदिर परिसराला व गाववेढा यात्रेला अडचण येत होती. एवढेच नव्हे, तर याठिकाणी असणार्‍या जेऊर गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतपणे गाळे बांधकाम करण्यात येत होते. त्यामुळे या विहिरीमध्ये गटारीचे पाणी तुंबून पावसाळ्यात जात असल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत होता. यासाठी जेऊरच्या ग्रामस्थांनी लेखी तक्रार दाखल केली होती. यावर गटविकास अधिकार्‍यांनी चौकशी करून अहवाल दाखल करून घेऊन ग्रामपंचायतीला हे अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांतर्फे पंचायत समितीसमोर त्यावेळी आमरण उपोषण चालू केले होते. यामध्ये त्यावेळी बालाजी गावडे, देवानंद पाटील, बाळासाहेब कर्चे, धन्यकुमार गारूडी हे उपोषणाला बसले होते. गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे-पाटील यांच्याशी चर्चेनंतर त्यांच्या आदेशाने जेऊरचे अतिक्रमण 21 ऑगस्टपर्यंत काढण्यात येईल, असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्याने ते उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र दिलेले आश्‍वासन प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याचे सांगत ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढले नाही. या निषेधार्थ वरील तिघांनी पुन्हा 26 जानेवारीला आमरण उपोषण चालू केले असून चौथ्या दिवशीही सलग हे चालू आहे. कोणत्याही अधिकार्‍यांनी याबाबत विचारपूस न केल्याने उपोषणकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.