Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Solapur › करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत चौरंगी लढत?

करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत चौरंगी लढत?

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:46PMकरमाळा : प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर चौरंगी लढतीचे स्पष्ट संकेत दिसू लागलेले आहेत.

करमाळा कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 18 जागेसाठी 181 उमेदवारी अर्ज कायम राहिलेले असताना त्यामध्ये व्यापारी मतदारसंघातील दोन जागा बिनविरोध निघालेल्या आहेत. तर हमाल व तोलार मतदारसंघातील 1 जागा अविरोध निघणार असल्यामुळे खरी लढत आता शेतकरी मतदारसंघातील 15 जागांसाठी होणार आहे. या 15 जागांसाठी 178 उमेदवारी अर्ज आजही कायम असताना त्यामध्ये 30 ऑगस्टपर्यंत 15 जागांसाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये कायम राहणार यावर बाजार समितीच्या निवडणुकीचा रणसंग्राम अवलंबून आहे.

सध्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधारी माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या गटासोबत आ. नारायण पाटील यांच्या गटाची युती असल्याने या युतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. त्याशिवाय विरोधी माजी आ. शामल बागल यांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाने त्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले असल्याने या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार, हे चित्र सध्यातरी स्पष्टपणे दिसू लागलेले आहे.

सध्या चारही पॅनेलच्या नेतेमंडळींकडून आपल्या पॅनलेमध्ये सक्षम उमेदवार उभा करून बंडखोरी टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहे. चौरंगी लढतीमध्ये आपला उमेदवार सक्षम देण्याच्या द‍ृष्टीने गटाच्या नेतेमंडळींकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे 15 जागांसाठी 60 उमेदवार निवडणुकीमध्ये कायम राहिले, तर उर्वरित 118 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज 30 ऑगस्टपर्यंत मागे घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे 118 जणांना उमेदवारी रिंगणातून बाहेर काढण्यासाठी चारही पॅनेलच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळ्या राजकीय खेळी सुरू असल्याचे राजकारण सुरू आहे. 30 ऑगस्टनंतर बाजार समितीच्या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर खरी लढाई सुरू होणार आहे.