Sat, Jun 06, 2020 08:14होमपेज › Solapur › ज्वारीच्या खळ्यावर मळणीची लगबग

ज्वारीच्या खळ्यावर मळणीची लगबग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

करमाळा : प्रतिनिधी

करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या खळ्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून आपल्या शेतावर प्रत्येक शेतकरी सध्या मळणी यंत्रावर ज्वारी करण्याचे काम वेगाने करताना दिसत आहे.
‘माळ्याच्या मळ्यामध्ये मोटचं पाणी वाही, झुळूझुळू पाण्यावरी पिकांचा गंध येई, बहरलेली शेती शेतकर्‍याला अन्न देई, जगाचा पोशिंदा हा शेतकरी आज निसर्गामुळे उपाशी राही, शेतकर्‍याची व्यथा जाणून घेण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे घाली, शेतावर गाणारी राघू-मैना आता मोटच्या गाण्याऐवजी मळणी यंत्रावर ‘टुकटूक’ चा आवाज देई’ अशा प्रकारची स्थिती ग्रामीण भागामध्ये ज्वारीच्या खळ्यावर पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागामध्ये पूर्वी ज्वारी करण्याचे काम हे कमीत-कमी महिनाभर चालत असे. शेतकरी शेतावर ज्वारी काढण्याचे काम केल्यानंतर तो महिलांकडून कणसाची कापणी करत असे. त्यानंतर सर्व कणसे खळ्यामध्ये एकत्र करून खळे तयार करणे, खळ्यामध्ये कणसाची रास टाकून त्यावर बैल, गाई अशा जनावरांच्या पाचा तयार करून तो मळणीचे काम करत असे. त्यानंतर ज्वारीची उफणी ही प्रक्रिया तशी किचकट होती. कारण वारा वाहत असेल तरच तो ज्वारी उफण्याचे काम करत असे, वारा नसेल तर वार्‍याची वाट पाहत दिवसभर बसण्याची पाळी खळ्यावर काम करणार्‍या शेतकरी व मजूर, महिलावर्गाला येत असे. मात्र, काळानुरूप आता सर्वच क्षेत्रामध्ये बदल होत असताना अलिकडच्या काळामध्ये मळणी यंत्र तयार झाले. या मळणी यंत्रावर ज्वारी टाकण्यासाठी दोन मजूर व भरून देण्यासाठी दोन मजूर खळ्यामध्ये काम करत असतील तर ज्वारी मळणीचे काम अत्यंत सुलभतेने व कमी वेळेमध्ये होत असल्याने या कामाला अलीकडच्या काळामध्ये गती आल्याचे चित्र दिसून येते.

मात्र, कमी वेळेमध्ये शेतावर ज्वारी काढण्यापासून ते मळणी यंत्रापर्यंत होत गेल्याने ज्वारीच्या कणसामध्ये कच्ची असलेली ज्वारी पूर्णपणे वाळून पक्की होत नसल्यामुळे ही ज्वारी जास्त कालावधीमध्ये टिकत नाही. कारण ही ज्वारी ही पूर्णपणे वाळू न दिल्यामुळे ती जास्त काळ टिकू शकत नाही. अलीकडच्या काळामध्ये मळणी यंत्रावर केलेली ज्वारी ही एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नाही. या ज्वारीला कीड लागण्याचे प्रमाण वाढत गेल्यामुळे आधुनिकतेच्या काळाबरोबर काही फायदे व काही तोटे जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे. ज्वारीच्या खळ्यावर माणसे राबण्याचा पूर्वीचा जो माहोल काळानुरूप बंद झाल्यामुळे आज आधुनिकते बरोबर शेतकरी पण धावू लागल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पूर्वी दिसणारा शेतावरील राबता हा दिसेनासा झालेला आहे. पूर्वीच्या काळी ज्वारी करण्याचे काम हे ग्रामीण ओव्या, ग्रामीण म्हणी व शेतकरी बांधावरील गाणी गावून तो करत असे. मात्र, हा सर्वच प्रकार बंद होवून आज ज्वारीच्या खळ्यावर मळणी यंत्रावर बसविण्यात आलेले इंजीन व त्या इंजीनमधून निघणारा फटाफटा आवाज हा जणू शेतकर्‍याला आपली शेती फटाफटा करत असल्याचाच संदेश देवू लागलेले आहे. खर्‍या अर्थाने जुन्याबरोबर नवीन स्वीकारत असताना ग्रामीण भागातील जुना बाज शेतकर्‍याने टिकवणे गरजेचे आहे. कारण, ग्रामीण संस्कृतीवरच आपल्या देशाचे संपूर्ण भवितव्य अवलंबून असताना ग्रामीण भागातील सर्व गोष्टी या संस्कृतीला धरून असताना आपली संस्कृती टिकवून धरण्यासाठी आता मळणी यंत्रावरसुध्दा ज्वारी करताना जुन्या गाण्याच्या आठवणी ताज्या करण्याची खरी गरज आहे.


  •