Thu, Aug 22, 2019 10:39होमपेज › Solapur › करमाळ्यातील स्फोटात एकाचा भीषण मृत्यू

करमाळ्यातील स्फोटात एकाचा भीषण मृत्यू

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 24 2017 10:43PM

बुकमार्क करा

करमाळा : तालुका प्रतिनिधी

मोटारसायकलवरून जात असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात एकाचा जागीच चिंधड्या उडून भयानक मृत्यू झाला आहे.पांडुरंग किसन तनपुरे (वय 41) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याची खबर शुभम पांडुरंग तनपुरे (दोघे रा. तनपुरे वस्ती, रा. वरकटणे, ता. करमाळा)  या मृताच्या मुलाने करमाळा पोलिसांत खबर दिली आहे. ही घटना आज, रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कोंढेज-साडे रस्त्यावर रामदास फाटके गुरुजी यांच्या वस्तीजवळ घडली आहे.

पाडुरंग तनपुरे हा बजाज सीटी 100 या मोटारसायकलवरून कोंढेजवरून वरकटणेकडे येत असताना  रामदास फाटके याच्या वस्तीजवळ आली असताना अचानक मोटारसायकलजवळ प्रचंड स्फोट झाला. यावेळी मोटारसायकलसह मृताच्या चिंधड्या झाल्या. 

पाडुरंग यांच्या हातापायांचे अक्षरशः तुकडे हवेत उडाले. अर्धे धड एकीकडे उडून पडले, तर स्फोट झालेल्या ठिकाणी पाच फूट लांब  रुंदीचा खड्डा पडला आहे. हा स्फोट इतका भयानक होता की, स्फोटाचा आवाज पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला मिळाल्याचे बोलले जात असून मृताच्या शरीराचे तुकडे पाचशे फूट अंतरावर पसरले होते. मोटारसायकलची टाकी एक किलोमीटर अंतरावर उडून पडल्याचे बोलले जात आहे.

हा स्फोट हा जिलेटिनच्या कांड्याचा असल्याची चर्चा होत असून याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक प्रशांत स्वामी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर पोलिसांच्या श्‍वान पथकानेही संपूर्ण परिसर पिंजून तपासणी केली. याबाबत पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे व हवालदार विश्‍वनाथ पवार पुढील तपास करत आहेत.