Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Solapur › संगणक प्रयोगशाळेसाठी शाळांना मोफत वीज द्या

संगणक प्रयोगशाळेसाठी शाळांना मोफत वीज द्या

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 9:59PM

बुकमार्क करा

करकंब : वार्ताहर

राज्यातील 8 हजार शाळांना केंद्रशासन पुरस्कृत आय.सी.टी.योजनेंतर्गत प्रत्येकी 18 लाख रु.प्रमाणे 1440 कोटी रु.किमतीच्या संगणक प्रयोग शाळा देण्यात आल्या. परंतु शाळांना औद्योगिक दराने वीज पुरवठा केला जात असल्याने त्या बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे संगणक प्रयोगशाळा सक्षम चालण्यासाठी शासनाने शाळांना मोफत किंवा माफक दराने वीज पुरवठा करावा अशी मागणी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली. शाळातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, 

स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मुलांचा टिकाव लागावा, जगातील नव नविन घटनांची त्यांना माहिती व्हावी. यासाठी प्रत्येक शाळेत संगणक व इंटरनेट असणे आवश्यक आहे. राज्यामध्ये आठ हजार शाळामध्ये शासनाने संगणक प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. तर अनेक शाळांनी लोकसहभागातून संगणक घेतले आहेत. परंतु शाळांना वीज दर हा औद्योगिक क्षेत्राचा लागू केल्याने शाळा आर्थिक संकटात आल्या आहेत. परिणामी वीज बील न भरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे खाजगी शाळांना वीज पुरवठा मोफत करावा किंवा माफक दराने करावा, अशी मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली. शासन सर्व काम ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात संगणक, इंटरनेट चालविता आले तर भविष्यात ऑनलाईन कामे करण्यास सोपे जाईल. प्रत्येक शाळेस संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट कनेक्शन, वीज पुरवठा शासनाने मोफत किवा माफक दराने केल्यास  स्पर्धेच्या युगात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थी अव्वल ठरतील, असा विश्‍वास आ. दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केला.  सभापती रामराजे निंबाळकर यांनी आ. दत्तात्रय सावंत यांच्या विशेष उल्लेखाद्वारे केलेल्या मागणीची दखल घेऊन शासनाने स्वतंत्र बैठक घेऊन यावर लवकर मार्ग काढावा, असे आदेश दिले.