सोलापूर : प्रतिनिधी
आज, शुक्रवारी दिवसभर कनिष्ठ महाविद्यालयांचा संप असल्याच्या चर्चा जिल्हाभर होत्या. मात्र शिक्षण अधिकार्यांकडे कोणत्याही संघटनेचे लेखी पत्र अथवा निवेदन आले नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय बंदचा घोळ दिवसभर सुरू असल्याचे दिसून आले.
राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांचे विविध प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. शिक्षण विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. त्यामुळे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालये शुक्रवारी, 2 फेब्रुवारी रोजी संपावर गेल्याची चर्चा जिल्हाभर होती; मात्र माध्यमिकचे शिक्षण अधिकारी सत्यवान सोनवणे यांच्याशी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला आणि या प्रकाराबद्दल विचारले असता त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या बंदची चर्चा ऐकून आहे; मात्र आमच्याकडे महाविद्यालय बंदबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी पत्र किंवा निवेदन आले नाही. त्यामुळे हा संप असल्याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली.