Wed, Jan 16, 2019 18:18होमपेज › Solapur › मी स्वत: भांडी घासतो, धुणे धुतो...!

मी स्वत: भांडी घासतो, धुणे धुतो...!

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 9:17PM सोलापूर : प्रतिनिधी

मी जरी अभिनेता असलो तरी माझ्या घरातील भांडी स्वत: घासतो, धुणी धुतो. एवढेच नव्हे तर स्वयंपाकही करतो. तेव्हा ही कामे स्त्री-पुरुष सर्वांनीच न लाजता करून स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात सिनेअभिनेता तथा ‘स्मार्ट सिटी’ सोलापूरचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर जितेंद्र जोशी यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना दिले.

दोन दिवस सोलापूर दौर्‍यावर असलेल्या जितेंद्र जोशी यांनी सोमवारी मनपातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छताविषयक स्पर्धेचे बक्षीस वितरण केले होते. स्वच्छ हॉटेल, हॉस्पिटल, शाळा व महाविद्यालयांचा यावेळी त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जोशी यांनी आमच्या शाळेला भेट द्यावी, अशी विनंती केली होती. त्यास प्रतिसाद देत जोशी यांनी मंगळवारी सेवासदन, नू.म.वि. या शाळा तसेच दयानंद वाणिज्य व कला महाविद्यालयाला भेट दिली. याप्रसंगी जोशी यांनी शाळेतील चिमुकल्यांशी मुक्‍त संवाद साधला. घरात कुणी नसले तरी माझे अडत नाही. भांडी घासणे, धुणी भांडी तसेच स्वयंपाकाची कामे मी स्वत: न संकोचता करतो. मला एक मुलगी आहे. त्यामुळे मला अभिमान आहे की मी आज सर्वप्रथम मुलींच्या शाळेला भेट देत आहे. यावेळी जोशी यांनी या शाळेतील स्वच्छतागृहावर केलेल्या स्वच्छतेचे संदेश देणार्‍या पेंटींग्जचे स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो काढले. एवढेच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फीही काढली.