Tue, Sep 25, 2018 03:14होमपेज › Solapur › तीन हजार शेतकर्‍यांच्या नावे जिल्हा बँकेने जमा केले 16 कोटी

तीन हजार शेतकर्‍यांच्या नावे जिल्हा बँकेने जमा केले 16 कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

राज्य शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जिल्हा बँकेकडील 31 हजार शेतकर्‍यांसाठी 170 कोटी रुपये शासनाने दिले असून लवकरच हे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मंगळवारी बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे हे दिवसभर कर्मचार्‍यांसमवेत ठिय्या मांडून बसले होते.

मंगळवारी दुपारपर्यंत या 170 कोटी रुपयांपैकी 2 हजार 820 शेतकर्‍यांच्या खात्यावर जवळपास 16 कोटी 80 लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मोटे यांनी दिली. याद्यांमध्ये काही त्रुटी आढळून येत आहेत. त्याची तपासणी सुरू असून त्या तत्काळ दुरुस्त करुन शासनाला ऑनलाईन सादर करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा बँकेतील सर्वच पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. ज्या शेतकर्‍यांच्या नावांवर पैसे सोडण्यात आले आहेत त्या शेतकर्‍यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून एसएमएस पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना असे एसएमएस प्राप्त होत आहेत त्यांनी संबंधित शाखेत जाऊन खात्री करून घ्यावी, असे आवाहनही मोटे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देऊन या कामकाजाची पाहणी केली तसेच कर्मचार्‍यांना कोणत्या अडचणी येत आहेत याची माहिती घेतली. त्यामुळे शासनाकडून आलेले पैसे तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी बँकेच्यावतीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी वेळोवेळी संबंधित शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.