Tue, Jun 25, 2019 13:08होमपेज › Solapur › सोलापूर : दूध दर आंदोलनात 'जनहित'ची उडी

सोलापूर : दूध दर आंदोलनात 'जनहित'ची उडी

Published On: Jul 16 2018 10:41PM | Last Updated: Jul 16 2018 10:41PMमोहोळ : प्रतिनिधी

दूध उत्पादकांच्या दुधाला पाच रुपये प्रति लिटर दराने थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा जनहित शेतकरी संघटना आज दिनांक १७ जुलैपासून दुधाचा एक थेंब देखील मुंबईला व दूध संघात संकलन करू देणार नाही. मुंबईला जाणारे दूध रोखून मोहोळ शहरात मोफत वाटणार आहे. येत्या काळात अंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिला. याबाबतचे लेखी निवेदन प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

दूध उत्पादक शेतकरी गेली कित्येक वर्षे दूध दराच्या बाबतीत अन्याय सहन करत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनहित शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकरी सरकारचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान घेतल्याशिवाय गप्‍प बसणार नाही. शासन गेली अनेक वर्षे दुधाचा भाव वाढवत नाही परंतु जनावरांना लागणार्‍या पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याचा कोणताही विचार सरकारकडून होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अन्याय सहन करावा लागत आहे, असे देशमुख म्‍हणाले.

सरकारने दुधाच्या भूकटीला निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान देऊन राज्यातील ठराविक दूध संघाला जास्तीत जास्त फायदा करून देण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोपही यावेळी देशमुख यांनी केला. दूध भुकटीला अनुदान देऊन शासनाने जो निर्णय घेतला आहे तो अन्यायकारक आहे यामुळे भविष्यात दूध उत्पादक जिवंत राहणार नाही. त्यामुळे दुधाला पाच रुपये अनुदान शासनाने त्वरित जाहीर करावे. कारण दूध उत्पादक आतून १७ रुपये खरेदी केलेले दूध मुंबईसह राज्यात ४२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे ही बाब सर्व उत्पादकांनाच नव्हे तर राज्यालाही माहिती आहे. 

या सर्वांची गोळाबेरीज शासनाने त्वरित करावी. यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांना दुर्लक्षित करून उत्पादकांवर अन्याय केला होता. त्या अन्यायाची मोठी किंमत गेल्या निवडणुकीत त्यांना मतदार बांधवानी दाखवून दिली. आतादेखील हे सरकार अशाच प्रकारे उत्पादकांवर अन्याय करत असेल तर यपुढील निवडणुकीत याही सरकाराला धडा शिकवल्या शिवाय आम्ही जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही, असा गर्भित इशारा देखील देशमुख यांनी निवेदनामध्ये दिला आहे. 

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिंदे, जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत नलवडे, मोहोळ तालुकाध्यक्ष सदाशिव वाघमोडे, युवक अध्यक्ष नाना मोरे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष दामाजी मोरे, माढा तालुका अध्यक्ष विजय मोरे, दीपक भोस्कर, आकाश गायकवाड, कुमार गोडसे, श्रीपती डोळे, चंदू निकम, ज्ञानदेव कदम, सुरेश नवले, ज्ञानेश्वर भोसले, संग्राम पाटील, राजाभाऊ गायकवाड, राजाभाऊ घोलप आदींसह जनहित शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.