Tue, Jun 25, 2019 14:10होमपेज › Solapur › सोलापूर : भोयरे येथे रंगला जगदंबा देवीचा दगडफेकीचा खेळ

सोलापूर : भोयरे येथे रंगला जगदंबा देवीचा दगडफेकीचा खेळ

Published On: Mar 06 2018 8:10AM | Last Updated: Mar 06 2018 8:10AMमोहोळ : प्रतिनिधी

भोयरे (ता. मोहोळ) येथे शुक्रवारी श्री जगदंबा देवीचा पारंपरिक दगडे फेकण्याचा खेळ उत्साहात झाला. 

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्घतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे गावामध्ये धुलिवंदन हे एकमेकांना दगडे मारून उत्साहात साजरे केले जाते. या दगड मारण्याच्या खेळास एक विशिष्ट परंपरा असून हा खेळ भाविक अगदी आनंदाने खेळत असतात.

हा दगडफेकीचा खेळ कसा खेळला जातो

भोयरे गावामध्ये धुलिवंदन दिवशी साधारण दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान श्री जगदंबा देवीच्या पावननगरीमध्ये आलेले भाविक-भक्‍त मंदिरातून दर्शन घेऊन पुजार्‍यासह भोगावती नदीच्या दिशेन जातात. त्यांनतर नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या होतात, त्यानंतर सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून थोडी दगडे मारतात. याच्यानंतर ते दोन्हीही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात, एक गट मंदिराच्या गाभार्‍यावर, तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा असतो. पुजारी मंदिरात पोहचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटांमध्ये तुफानी दगडफेक सुरू होते. या दोन्ही गटांमध्ये अंतर फक्‍त 150 ते 200 फूट असते. साधारण हा खेळ 20 मिनिटे चालू असतो. पुजार्‍यांना खेळ बंदचा इशारा करताच दोन्हीही गट दगडे मारण्याचे बंद करून मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात. या खेळामध्ये भाविक -भक्‍तांना मोठ्या प्रमाणात दगड लागतात.

दगडफेकीच्या खेळाची वैशिष्ट्ये

या खेळामध्ये तरुणवर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या खेळामध्ये अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वच भाविक सहभागी होताना दिसतात. या खेळामध्ये भाविकांना कितीही दगडे लागली, मोठी जखम झाली तरीही कोणी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जात नाही. त्या जखमेंवरती देवीचा अंगारा लावल्यास ती बरी होत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही वय, नियम व अटीची बंधने नसतात. अन् सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या खेळामध्ये सहभागी झालेल्या दोन्हीही गट कोणतेही राजकीय गटाचे नसतात. सहभागी भाविक कोणताही रोष, शत्रुत्व, द्वेष मनात न ठेवता दगडाची एकमेकांवर उधळण करत असतात. या खेळाचे महत्त्व म्हणजे पायथ्याच्या गटाची दगडे फक्त धुलिवंदन दिवशी वरती दुसर्‍या गटापर्यंत पोहचतात, अशी अख्यायिका भोयरे नागरिकांतून व्यक्त होते.

देवीचा महिमा

मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील भोयरे गाव नेहमी चर्चेत असते ते म्हणजे आई जगदंबेच्या मंदिरामुळेच ! भोयरे गावाच्या उशाला उंच डोंगरावरती हेमाडपंथी श्री जगदंबा देवीचे प्राचीन मंदिर असून या देवीच्या अनेक अख्यायिका इतिहासाच्या पावलोपावली आपणास वाचायला, पहायला मिळतात. भोयरे गावातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील भाविक- भक्तांची देवीवर अफाट श्रद्धा आहे. भोयरे गावची श्री जगदंबा देवी ही तुळजापुरची तुळजाभवानीची लाडकी बहिण असल्याचे नागरिकांतून व्यक्‍त होते. भाविक- भक्‍त देवीला प्रसन्न  करून घेण्यासाठी आज धुलिवंदन दिवशी गावामध्ये दोन्ही गटात दगडफेकीचा खेळ खेळतात. हा दगडफेकीचा खेळ खूप प्राचीन काळापासून खेळत आला असून आजही तो मोठ्या उत्साहात खेळला जातो. हा साहसी खेळ भोयरे नागरिक मात्र आनंदाने, उत्साहाने व जोमाने खेळतात. खरे तर असा हा दगडेफेकीचा खेळ महाराष्ट्रामध्ये कोठेही पहायला मिळत नाही हे मात्र निश्‍चितच ! त्यामुळे सर्वच परिसरातून हा खेळ पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

यंदा यांना दगड लागले

लक्ष्मण शिंदे, दिनेश सिरसट, स्वप्निल चव्हाण, दत्तराज पवार, दिनेश सिरसट, विशाल साठे, लक्ष्मण लोहार,नाना पवार,अविनाश थोरबोले, धनंजय साठे यांना दगड लागले.