Mon, Mar 25, 2019 02:53
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सोलापूर : 'वाळू'वरून पोलिस निरीक्षकाची, शिपायाची चौकशी सुरू

सोलापूर : 'वाळू'वरून पोलिस निरीक्षकाची, शिपायाची चौकशी सुरू

Published On: Feb 23 2018 10:47PM | Last Updated: Feb 23 2018 10:28PMसोलापूर : प्रतिनिधी

आयुक्‍तालयामध्ये वाळूवरून सुरू झालेले  प्रकरण  काही  मिटता  मिटेनासे झालेले  आहे.  पोलिस  निरीक्षकाविरुद्ध पोलिस कर्मचार्‍याने केलेल्या तक्रारी अर्जाचा तसेच  कर्मचार्‍याने दमदाटी करून वाळूची गाडी सोडून दिलेल्या प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस आयुक्‍त सकळे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी दिली.

सोमवारी रात्री सोरेगाव ते सैफुल रस्त्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल म्हणून काम करणार्‍या पोलिस कर्मचारी वसेकर यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारी गाडी पकडली होती. त्यानंतर गाडीचालक व मालकाने आयुक्‍तालयामध्ये वाळूच्या गाड्यांची ‘यादी’ करणार्‍या पोलिस शिपाई भाऊसाहेब शिंदे या कर्मचार्‍याला फोन केल्यानंतर शिंदे याने बीट मार्शलशी बोलून  त्या कर्मचार्‍याला दमदाटी करुन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नावाचा वापर करुन वाळूची गाडी सोडून देण्यास सांगितले होते. त्यामुळे बीट मार्शलने  वाळूची गाडी सोडून दिली होती. ही बाब विजापूर नाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सावंत यांना समजल्यानंतर त्यांनी बीट मार्शलला बोलावून  घडला प्रकार विचारला आणि याबाबत अहवाल देण्यास सांगितले. त्यानंतर बीट मार्शलने अहवाल दिल्यानंतर पोलिस निरीक्षक  सचिन सावंत यांनी याबाबतचा अहवाल पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्याकडे पाठवून दिला. 

दरम्यान, मंगळवारी   पोलिस शिपाई भाऊसाहेब शिंदे यांनी पोलिस निरीक्षक  सचिन सावंतविरुद्ध त्यांनी आपल्याला धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिस आयुक्‍तांकडे तक्रारी अर्ज दिला.

पोलिस आयुक्‍त तांबडे यांनी या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश  सहायक पोलिस आयुक्‍त सकळे यांना दिलेले असून या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरु आहे. 

‘वाळू’च्या वसुलीवरून रंगले आयुक्‍तालयात प्रकरण

शहर पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीमध्ये वाळूच्या तस्करीची वसुली करण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून पोलिस कर्मचार्‍यांमध्ये अधिकार्‍यांप्रमाणेच शीतयुध्द सुरु आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळूची वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांना विश्‍वासात न घेता पोलिस शिपाई शिंदे याने परस्पर अधिकार्‍यांना माहिती न होऊ देता वाळूच्या गाड्यांची यादी बनविली आहे. एकीकडे हे सर्व करताना शिंदे याने अनेक पोलिस अधिकार्‍यांशी आर्थिक तडजोड केल्याची चर्चा होत आहे. दुसरीकडे पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये व शिंदेंमध्ये चांगलेच शीतयुध्द पेटलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आयुक्‍तालयात चांगलेच प्रकरण रंगले आहे.