Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Solapur › आंतरराज्य घरफोड्यास अटक; साडेसतरा तोळ्यांचे दागिने जप्त

आंतरराज्य घरफोड्यास अटक; साडेसतरा तोळ्यांचे दागिने जप्त

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात जालना येथून वर्ग करून घेतलेल्या अट्टल आंतरराज्य गुन्हेगाराकडून पोलिसांनी 5 लाख 20 हजार रुपये किमतीचे   साडेसतरा  तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले. 

 किशोर  तेजराव  वायाळ (वय 45, रा. मेरा बुद्रुक, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा  साथीदार  लहू  दगडू  धांदरगे (रा. रोहणा, ता. खामगाव, जि. बुलडाणा) हा अजूनही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

त्याच्याकडून दक्षिण कसब्यातील राजवाडा संकुलामधील गहिनीनाथ भीमराव पाटेकर यांचे  बंद घर फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा  उघडकीस आलेला  आहे.  

गहिनीनाथ पाटेकर यांच्या मुलाच्या मेहुणीच्या घरी कर्णिकनगर येथे 6 डिसेंबर 2017 रोजी सुवासिनीचा कार्यक्रम होता. त्यामुळे पाटेकर यांच्या घरातील सर्वजण दुपारी घराला कुलूप लावून गेले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर दोन अज्ञात व्यक्ती आल्या होत्या. त्या दोन व्यक्तींनी पाटेकर यांची सून आरती यांना केबलचे काम करण्यासाठी टेरेसची चावी मागितली. त्यावेळी आरती यांनी  त्या  दोन व्यक्तींना आम्ही कार्यक्रमासाठी बाहेर जात आहोत, समोरच्याकडून चावी घ्या असे सांगितले व त्या निघून गेल्या. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील दोन्ही  लोखंडी कपाटे व आतील लॉकर तोडून 6 लाख 9 हजार 400 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना पोलिसांनी एका गुन्ह्यात किशोर वायाळ यास घरफोडी करताना अटक करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सोलापूर पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी जालना पोलिसांशी संपर्क साधला असता वायाळ हाच सोलापूरच्या गुन्ह्यातील गुन्हेगार असल्याचे व त्याच्याकडे मिळालेले काही दागिने हे सोलापुरातील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. 

त्यानुसार पोलिसांनी किशोर  वायाळ  यास सोलापुरच्या गुन्ह्यात वर्ग करुन आणले व जालना पोलिसांकडून  गुन्ह्यातील 10 तोळ्याचे सोन्याचे दागिनेताब्यात घेतले. वायाळ याच्याकडून  साडेसात तोळ्याचे दागिने जप्त केले असून त्याच्याकडून एकूण साडेसतरा तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 

ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय जगताप, शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, पोलिस शिपाई मनोज राठोड, दादासाहेब सरवदे, धनंजय बाबर यांनी केली.