सोलापूर : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘भारतनेट’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 12 हजार 378 ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामाबद्दल महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात 269 ग्रामपंचायती या इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाने अलीकडेच ‘भारतनेट’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायती या इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने उत्कृष्ट राज्याचा बहुमान मिळविला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील 2 हजार 421 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटसेवा
या विभागातील 2 हजार 421 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटसेवा उपलब्ध झाली आहे. या विभागात 698 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटसेवा उपलब्ध झालेला पुणे जिल्हा अग्रेसर ठरला आहे. याशिवाय सांगली जिल्ह्यातील 517, कोल्हापूर 504, सातारा 433 आणि सोलापूर जिल्ह्यातील 269 ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यातील 3 हजार 200 ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडल्या
मराठवाड्यातील 3 हजार 200 ग्रामपंचायती इंटरनेटसेवेने जोडण्यात आल्या आहेत. या विभागात 807 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटसेवा उपलब्ध झालेला बीड जिल्हा अग्रेसर ठरला आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील 609, जालना 480, लातूर 335, नांदेड 318, औरंगाबाद 294, परभणी 247 आणि हिंगोली जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत.