होमपेज › Solapur › आंतरजातीय विवाह करणारे ‘सैराट’ जोडपेच हिरो : डॉ. भारुड 

'आंतरजातीय विवाह करणारे ‘सैराट’ जोडपेच हिरो'

Published On: May 21 2018 11:14PM | Last Updated: May 21 2018 10:35PMसोलापूर : प्रतिनिधी
समाजातील जातीव्यवस्था मोडीत काढून, आंतरजातीय विवाह करण्याचे धाडस करणारे ‘सैराट’ जोडपे हेच आमच्यासाठी खरे हिरो व हिरोईन आहेत. त्यांच्याकडूनच समतेचा मंत्र दिला जात आहे. त्यांच्या या धाडसाबाबत कौतुक करावे तितके कमीच आहे. जोडप्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ सोडू नये अन्यथा पुरस्कार परत घेण्यात येईल, असे गमतीने मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी व्यक्‍त केले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या समता पंधरवडा कार्यक्रमाचा समारोप सोमवारी सकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात विविध कार्यक्रमांनी करण्यात आला. यावेळी डॉ. भारुड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील होते. यावेळी आंतरजातीय, दिव्यांग व दिव्यांग -सदृढ विवाह करणार्‍या जोडप्यांचा, दलितमित्र पुरस्कारप्राप्‍त व्यक्‍तींचा सन्मान करण्यात आला. 

उपाध्यक्ष पाटील म्हणाले, समाजकल्याण विभागाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत  आहेत. या योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जातीवरून भेदभाव होणे दुर्दैवी असून स्त्री व पुरुष अशा दोनच जाती जगात असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.  अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे म्हणाले, महापुरुषांनी घालून दिलेल्या विचारांची आचरणातून कृती होणे आवश्यक आहे. आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही समता पंधरवडा साजरे करण्याची वेळ येणे दुर्दैवी बाब आहे. ज्यादिवशी समतेसाठी अशी जागृती होण्याची वेळ येणार नाही त्याच दिवशी महापुरुषांचा विचार रुजला, असे होणार आहे. जि.प.ने अपंग व सदृढ विवाह करणार्‍या जोडप्यांना 50 हजार रुपयांची मदत करून राज्यात आदर्शवत योजना राबविली आहे. दलित वस्ती सुधार योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत आहेे. मात्र निधी खर्च करण्यासाठी अपेक्षित गती नाही. जन्म कोणाच्या घरात घ्यायचा हा विषय कोणाच्याही हातात नाही. जातीवरून भेदभाव होणे ही मानवनिर्मित बाब असून असा प्रकार बंद झाल्याशिवाय विकास होणार नाही. 

समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, समाजकल्याण अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी प्रास्तविक केले. सभापती विजयराज डोंगरे, रजनी देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या 
आचरणाची आज गरज असून असा महापुरुष पुन्हा होणार नसल्याचे मत व्यक्‍त केले. दलितमित्र पुरस्कारप्राप्‍त व्यक्‍तींच्यावतीने प्रवीण भालशंकर यांनी मनोगत व्यक्‍त करून यापुढे जिल्हा परिषद मित्र म्हणून समाजकल्याण विभागाचे काम करण्याचा मानस व्यक्‍त केला. या कार्यक्रमास दलितमित्र पुरस्कारप्राप्‍त राजाभाऊ सरवदे, बाळासाहेब कोळी, तात्यासाहेब भोसले, प्रशांत भालशंकर, जि.प. सदस्य शैला गोडसे, शिवाजी सोनवणे, सुनंदा फुले, कविता वाघमारे, संगीता धांडारे, अतुल खरात, शोभा वाघमोडे, रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.