Sat, Jul 20, 2019 09:12



होमपेज › Solapur › आयुक्‍तालयातील वसुलदारांची चौकशी सुरु

आयुक्‍तालयातील वसुलदारांची चौकशी सुरु

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 10:27PM



सोलापूर : प्रतिनिधी

आयुक्‍तालयामध्ये  अवैध   धंद्यांची वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात एका संघटनेकडून पोलिस आयुक्‍तांना देण्यात आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी सहायक पोलिस आयुक्‍तांकडून सुरु आहे. तक्रारी अर्ज देणार्‍या संघटनेला वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांचे पुरावे द्या, अन्यथा तुमच्यावरच पोलिसांची बदनामी करण्यात आल्याबाबत कारवाई करण्याचा इशारा चौकशी अधिकार्‍यांकडून देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे  तक्रारी अर्ज करणार्‍या संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून आयुक्‍तालयामध्ये अवैध  धंदे सुरु झाले व या अवैध धंदेवाल्यांकडून आयुक्‍तालयातील   तसेच   विविध    पोलिस ठाण्यांकडील काही पोलिस कर्मचारी हे वसुली करीत असल्याबाबतचा तक्र्रारी अर्ज एका संघटनेकडून पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांना देण्यात आला होता. या तक्रारी अर्जामध्ये आयुक्‍तालयातील कोणता कर्मचारी हा कोणत्या अवैध धंद्याची वसुली कोणत्या अधिकार्‍यासाठी  करतो, याची नावानिशी तक्रार करण्यात आलेली आहे. 

या तक्रारी अर्जाची गंभीर दखल घेत पोलिस  आयुक्‍त तांबडे यांनी  सहायक  पोलिस  आयुक्‍तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.  त्यानुसार अर्जाची चौकशी सुरु करण्यात आली असून तक्रारी अर्जात नमूद असलेल्या सर्व कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात येत आहे. तक्रारी अर्ज करणार्‍या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनाही चौकशीसाठी   बोलावण्यात  येऊन  वसुली करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांबाबत पुरावे देण्याबाबत सांगण्यात आले. परंतु तक्रारी अर्ज देण्यास सोकावलेल्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून मात्र पुरावे देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे तक्रारी अर्ज देणार्‍या संघटनेच्या पदाधिकार्‍यांना कर्मचार्‍यांच्या वसुलीबाबत पुरावे द्या अन्यथा तुमच्यावर पोलिसांची बदनामी केल्याबाबत कारवाई का करु नये म्हणून नोटीस देण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रारी अर्ज करणार्‍या संघटनेच्या पदाधिकार्‍यांची भंबेरी उडून धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पुढीलकाळात खरोखरच चौकशी अधिकार्‍याकडून तक्रारी अर्ज करणार्‍यांवर पुरावे न दिल्यास कारवाई होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.