Sun, Jul 21, 2019 01:57होमपेज › Solapur › ‘वीज वितरण’च्या अन्यायाविरुद्ध लढा पुकारणार

‘वीज वितरण’च्या अन्यायाविरुद्ध लढा पुकारणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

करमाळा : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना चुकीच्या पध्दतीने आकारलेले वीज बिल कमी करून मिळावे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांमध्ये कृषी पंपांना आकारलेले वीज बिल हे बोगस असून शेतकर्‍यांवर होत असलेल्या अन्यायाप्रकरणी लढा पुकारणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दिली.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, करमाळा शहर व तालुका परिसरामध्ये 2012-13 ते 2015-16 या पाच वर्षांमध्ये दुष्काळ होता. या पाच वर्षांमध्ये अतिअल्पसुध्दा पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील जमिनीमध्ये पाण्याची पातळी कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 700 फूट खोलवर गेलेली होती. असे असताना तालुक्यातील विहिरी, नदी व नाले यांना पाणी नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरींना पाणी असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तरी पण करमाळा येथील वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील शेतकर्‍यांना गेले तीन वर्षे कृषी पंपांना वीज बिले दिलेली नव्हती. मात्र यावर्षी पाऊस पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांतील वीज बिलांची आकारणी करून सध्या शेतकर्‍यांना वीज बिले देण्यात आलेली आहेत. ही बिले न भरल्यास वीज वितरण कंपनीकडून शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय असून न वापरलेले वीज बिल आकारून शेतकर्‍यांना मातीत घालण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून केले जात आहे. सुधारित वीज बिल शेतकर्‍यांना द्यावे यासह वीज वितरणच्या अन्यायाविरुद्ध लवकर आंदोलन करणार असल्याचे खुपसे-पाटील यांनी सांगितले आहे.