Sun, Jul 21, 2019 17:00
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सोलापूर : भाड्याने राहणार्‍यांची माहिती पोलिसांना द्यावी

सोलापूर : भाड्याने राहणार्‍यांची माहिती पोलिसांना द्यावी

Published On: Feb 15 2018 10:31PM | Last Updated: Feb 15 2018 8:56PMसोलापूर : प्रतिनिधी  

घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, जुने वाहन विक्री- खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्‍वस्त व काळजीवाहक यांनी जिल्ह्यात  नव्याने भाड्याने राहण्यास येणार्‍या अनोळखी व्यक्तींची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यात यावी, असे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत.

 देशात, राज्यात व महत्त्वाच्या शहरात दहशतवादी कारवायात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी हे स्थानिक लोकांत मिसळून तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्य करून घातपाती कारवायांना अंतिमरूप देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी व मालमत्तेचे नुकसान होत असून त्याचबरोबर अशा घटनांमुळे जनमानसांमध्ये घबराटीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार्‍या घटना वारंवार घडत आहेत. या दहशतवादी कारवायाच्यावेळी ते भाड्याने रूम, प्लॉट, लॉज घेऊन राहतात. तसेच मश्जिद, चर्च, धर्मशाळा येथे आश्रय घेतात किंवा ही जागा विकत किंवा लिजने घेतात. यासाठी  ते स्थानिक ओळख म्हणून प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर,  एजंट जुने वाहन विक्री-खरेदी करणारे दुकानदार यांची मदत घेतात.

जिल्ह्यात नवीन राहण्यासाठी येणार्‍या व्यक्ती यांची माहिती असणे आवश्यक असून अशी माहिती संबंधित पोलिस स्टेशनला देणे गरजेचे आहे. जेणेकरुन भविष्यात होणार्‍या  दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध होऊ शकतो. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न अबाधित राहण्यास मदत होईल आणि लोकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांतता अबाधित राहील.

यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट जुने वाहन विक्री-खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्‍वस्त व काळजीवाहक यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही अनोळखी नवीन राहावयास येणार्‍या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जी-जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलिस स्टेशनला त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना रहावयास जागा पोलिसांना माहिती न देता उपलब्ध करून देणे. 

तसेच  नवीन, जुने वाहन घेण्यास येणार्‍या कोणत्याही अनोळखी व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्या संबंधीची संपूर्ण माहिती, तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलिस ठाणेस त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना पोलिसांना माहिती न देता जुने वाहन खरेदी-विक्री / भाड्याने उपलब्ध करुन देण्यास कलम 144 अन्वये बंदी असून हे आदेश  5 एप्रिलपर्यंत सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण हद्दीत (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून)  सर्व नगरपालिका हद्दीत लागू असल्याचे  अप्पर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.