Thu, Aug 22, 2019 13:03होमपेज › Solapur › इंद्रायणीचा मुहूर्त अखेर 6 मार्चला

इंद्रायणीचा मुहूर्त अखेर 6 मार्चला

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:07PMसोलापूर : प्रतिनिधी

इंद्रायणी सुरु करण्याचा  अखेर मुहूर्त लागला असून 6 मार्चपासून सोलापूर-पुणे यादरम्यान बंद झालेली इंद्रायणी पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी सोमवारी केली. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.

1 नोेव्हेंबरपासून वाशिंबे-जेऊर या 18 कि.मी.च्या रेल्वेमार्गावर ट्रॅकच्या कामामुळे (रुळाखालील खडी बदलण्याचे कार्य) इंद्रायणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर काही रेल्वे गाड्या कुर्डुवाडी व भिगवणपर्यंत वळविण्यात आल्या होत्या. वाशिंबे-जेऊर ट्रॅकवर 1 नोव्हेंबरपासून रोज पावणेदोन तासांचा म्हणजेच 1 तास 45 मिनिटांचा  ब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक 125 दिवसांचा होता.
हुतात्मा एक्स्प्रेसची गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने मुंबई-पुणे यादरम्यान धावणारी इंद्रायणी 2009 साली सोलापूरपर्यंत वाढविली होती. सोलापूर रेल्वे विभागाने 12169/12170 हे क्रमांक देत सोलापूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस इंटरसिटी असे नाव दिले होते. परंतु अनेक प्रवासी त्याला इंद्रायणी या नावानेच ओळखतात. प्रवाशांनी या रेल्वे गाडीला भरघोस प्रतिसाद दिला.दुपारच्या वेळी पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांचा मोठा लोंढा या गाडीकडे वळला होता.

ऑक्टोबर (2017) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तत्कालीन डीआरएम अजयकुमार दुबे यांची बदली झाली व मुंबई येथे कार्यरत असलेले हिंतेद्र मल्होत्रा यांनी सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापकपदाचा पदभार घेतला. त्यांनी सोलापूर डिव्हिजनमधील रेल्वेमार्गाची पाहणी करत असताना जेऊर ते वाशिंबे यादरम्यान रुळाखालील खडी घसरल्याचे  निदर्शनास आले. मोठा अपघात होण्याची दाट चिन्हे होती. हे कार्य हाती घेताना त्यांनी कठोर निर्णय घेतला व इंद्रायणी 125 दिवस रद्द करुन रोज 1 तास 45 मिनिटांचा ब्लॉक घेतला व रुळाखालील खडी बलण्याचे कार्य पूर्ण केले.
पुण्याकडे जाणारी दैनंदिन इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द झाल्याने अनेक प्रवासी हवालदिल झाले. त्यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून तोकडे उपायदेखील करण्यात आले होते. प्रवाशांच्या हितासाठी काम करणार्‍या अनेक संघटनांनी याचा कडाडून विरोध केला होता. योग्य उपाययोजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात याव्यात, अशा मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या. अखेर रेल्वे प्रशासनाने खंडित केलेल्या रेल्वे गाड्या 6 मार्चपासून पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला आहे.

6 मार्चपासून पूर्ववत होणार असलेल्या रेल्वे गाड्या
सोलापूर मध्य रेल्वे विभागातील जेऊर ते वाशिंबे यादरम्यान तांत्रिक कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या आता 6 मार्चपासून पूर्वपदावर येणार आहेत. यामध्ये साईनगर-पंढरपूर-साईनगर एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर डेमू, हैदराबाद-पुणे-हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.