Tue, Apr 23, 2019 23:48होमपेज › Solapur › गौरव भारतीय लोककलेतून एकात्मतेचे दर्शन

गौरव भारतीय लोककलेतून एकात्मतेचे दर्शन

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 8:17PM

बुकमार्क करा
अकलूज : तालुका  प्रतिनिधी  

हजारों रसिकांनी गच्च भरलेल्या क्रीडा संकुलातील भव्य देखण्या रंगमंचावर सुमारे  2 हजार विद्यार्थी, कलाकारांनी सादर केलेल्या महाराष्ट्रासह देशातील पारंपरिक   लोकनृत्याच्या सुंदर कलाविष्काराला  उपस्थितांनी मनमुराद दाद दिली, तर सहकारमहर्षींच्या गौरवगाथेतून रसिक मंत्रमुग्ध झाले. 

विजयसिंह मोहिते-पाटील  क्रीडा संकुल येथे अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने  सांस्कृतिक  भारताच्या  विविधतेतून एकात्मतेचे दर्शन घडविणार्‍या ‘गौरव भारतीय लोककलेचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांना आभिवादन या कार्यक्रमातून केले. कार्यक्रमास कोल्हापूरचे खा. युवराज संभाजीराजे, नागपूरचे श्रीमंत संग्रामसिंहराजे भोसले, खा.विजयसिंह मोहिते-पाटील, आ. गणपतराव देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक जयसिंह मोहिते-पाटील, माजी आ. जयवंतराव जगताप, बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,  आ. हणमंतराव डोळस, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्या कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्य. अधिकारी  डॉ. राजेंद्र भारुड आदी मान्यवर उपस्थित होते.   

प्रारंभी उपस्थितांनी रंगमंचावर  सहकारमहर्षींच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले.  संस्थेतील विविध 13 संचलन पथकाने शिस्तबद्ध संचलन करीत सहकारमहर्षींना सलामी दिली. महर्षी गिताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

प्रास्ताविकात अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील  म्हणाले की, ग्रामीण मुलांना शिक्षण मिळावे म्हणून 1948 साली सहकारमहर्षींनी शिक्षण संस्थेची  स्थापना केली. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. काळानुसार आधुनिक महाविद्यालयेही उभारली. ग्रामीण भागातून कलाकार, खेळाडू तयार व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानुसार प्रताप क्रीडा मंडळाच्या समूहनृत्य स्पर्धेतून 38 वर्षांत 59 हजार विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर संग्रामसिंह    मित्र मंडळाच्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेतून 13 वर्षांत 39 हजार खेळाडू तयार झाले. या खेळाची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. संस्थेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्चपदावर काम करतात. बौद्धिक वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमातून 1941 कलाकारांचा सहभाग असून कलाकारांना प्रोत्साहन व महर्षीकाकांना आदरांजली  असल्याचे सांगून संस्थेने यापूर्वी राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. भव्य रंगमंचावर  गावाची प्रतिकृती उभारली होती. प्रारंभी ‘उठ पंढरीच्या राजा’ या भक्तिगीतातून गावातील पहाट जागी केली. बैलगाडी, म्हशीही समोर आल्या. ‘सर्जा राजाची जोडी’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या दिंडी सोहळ्याची भव्यतेला रसिकांची दाद मिळाली.

आंध्र प्रदेशातील लोकनृत्य, जोगवा गीत, राजस्थानी घुमर, केरळी, वाघ्या मुरळी, बुमरों बुमरोंचा काश्मिरी, ओरिसा जबलपुरी, दर्याचा कोळी, पंजाबी भांगडा, तेलंगणाची यल्लमा, शिवतांडव, रेषमाच्या रेघातील लावणी, हरियाणाचा घुमर, या सादर झालेल्या लोकगीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.