होमपेज › Solapur › ‘उजनी’तून विसर्ग वाढविला

‘उजनी’तून विसर्ग वाढविला

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:32PMबेंबळे ः वार्ताहर

उजनी धरणातून शेती व पिण्यासाठी 4 गाळमोर्‍यांतून 600 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत तो विसर्ग आता 2050 क्युसेस इतका करण्यात आला आहे.

भीमा नदीला पाणी सोडण्यासाठी जिल्ह्यातील  सामान्य नागरिकांसह नेतेमंडळींनी संप, मोर्चा, रस्ता रोको आदी आंदोलने केली होती. मंगळवारी पाटबंधारे विभागाला पाणी सोडावे, असा अधिकृत मेल आला आणि 600 क्युसेस वेगानेे पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पुढे रात्री यात वाढ करून 900 क्युसेस  करण्यात आला.  पुन्हा त्यात गुरुवारी वाढ करत तो 2050 क्युसेस करण्यात आला आहे.

सध्या उजनी धरणातून 8 मेपासून कालव्याद्वारे 3350 क्युसेसने विसर्ग चालू आहे. बोगद्यातून  425 क्युसेस वेगाने, तर गुरुवारपासून भीमा नदीतून 2050 क्युसेस वेगाने विसर्ग सुरू झाला होता. भीमा नदीला पाणी सुटल्याने भीमाकाठच्या शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उजनी धरण जरी उणेमध्ये असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. सध्या एकूण पाणीसाठा 60.48 टीएमसी असून त्यापैकी उपयुक्‍त पाणीसाठा उणे 3.17  टीएमसी एवढा आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उजनी धरणाची स्थिती समाधानकारक असल्याने धरण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व मान्सूनच्या तोंडावर मृतसाठ्यामध्ये गेलेले असले तरी धरणाची स्थिती उत्तम  आहे.

उजनी धरणामधून सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुसरे आवर्तन भीमा नदीवरील नगरपालिका असलेल्या  पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व इतर ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मनपाच्या मागणीनुसार साधारणपणे पाच ते साडेपाच टीएमसी एवढे पाणी सोडले जाणार आहे. औज बंधार्‍यात 0.40 टीएमसी पाणी साठविण्यासाठी 5 ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागते आहे.

दरम्यान, उजनी धरणाच्या मुख्य कालव्यामधून उजनी उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रामधील सिंचनासाठी दुसरे आवर्तन सुरू असून हे आवर्तन उजव्यासाठी साधारणपणे 1 जूनपर्यंत चालणार आहे. त्यानंतर उजव्या कालव्याद्वारे माण नदीत पाणी सोडण्यात येणार आहे व हे पाणी डाव्यासाठी व माण नदीसाठी साधारणपणे 6 जूनपर्यंत राहील व त्यानंतर भीमा नदीत जास्त दाबाने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती भीमा पाटबंधारे  विभागाकडून देण्यात आली आहे.