होमपेज › Solapur › निधीत वाढ केल्याने कामांना वाढली मागणी 

निधीत वाढ केल्याने कामांना वाढली मागणी 

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 8:21PMसोलापूर : संतोष आचलारे

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधा या योजनेतून घेण्यात येणार्‍या कामांसाठी जवळपास दुप्पट निधी वाढ झाल्याने ग्रामपंचायतींकडून कामांची मागणी वाढू लागली आहे. जनसुविधा योजनेची कामे आपल्याच गावाला मिळावीत यासाठी सरपंचांचा ओढा आमदार व जि.प. पदाधिकार्‍यांकडे दिसून येत आहे. 

राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा नियोजन समितीला निधी दिला जातो. या निधीतून जनसुविधा अंतर्गत विविध कामे घेण्यासाठी स्वतंत्रपणे निधीची तरतूद करण्यात येते. ग्रामीण भागातील दहनभूमी व दफनभूमीच्या कामासाठी यापूर्वी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येत होता. या कामांसाठी आता राज्य शासनाने 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या निधीतून दहन किंवा दफनभूमीचे भूसंपादन, चबुतर्‍याचे काम, शेडचे काम, पोहोच रस्ता, कुंपण, पाण्याची सोय, स्मशानघाट, जमीन सपाटीकरण व तळफरशी, स्मृती उद्यान आदी कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी 12 लाख रुपयांचा निधी देण्यात येत होता. हा निधी अपुरा असल्याने शासनाने आता यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देण्यास सुरुवात केली आहे. या निधीतून नवीन ग्रामपंचायत बांधकाम, जुन्या ग्रामपंचायतींच्या इमारतींचा विस्तार, पुनर्बांधणी, ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण, सुशोभिकरण आदी कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जनसुविधा योजनेंतर्गत कामांची अनेक व्याप्‍ती वाढविण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार केंद्र विकसित करण्यासाठी 15 लाख, गाव तलावातील गाळ काढून सुशोभिकरण करण्यासाठी 15 लाख, घनकचरा व्यवस्था करण्यासाठी 20 लाख, तर भूमिगत गटारी बांधकाम करण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी जनसुविधा योजनेतून देण्यात येत असल्याने ग्रामपंचायतींना नव्या कामांसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ग्रामपंचायतींच्या हद्दीत अस्तित्वात असलेल्या विहिरींवर सौरऊर्जावर आधारित दुहेरी हातपंप बसवून जलशुध्दीकरणासाठी आरओ मशिनची व्यवस्था करण्यासाठी 20 लाख व गावातील रस्ते, जोड रस्ते यासाठीही स्वतंत्रपणे 20 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतींसाठी देण्यात येत असल्याने या कामांना मागणी वाढली आहे.