Tue, Mar 26, 2019 07:39होमपेज › Solapur › जिल्ह्यात 849 बचत गटांद्वारे सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

जिल्ह्यात 849 बचत गटांद्वारे सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 8:43PM
सोलापूर : बाळासाहेब मागाडे
ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व महिलांना माफक खर्चात सॅनिटरी नॅपकीन मिळावे यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील 849 बचत गटांनी पुढाकार घेतला असून त्यापैकी 145 बचत गटांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. 
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीन, वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीवजागृती निर्माण करणे, त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध व्हावे या हेतून राज्य सरकारने अस्मिता योजना सुरु केली आहे. ग्रामीण भागातील जि.प. शाळांतील 11 ते 19 वयोगटातील मुली व महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींना 240 मि.मी. आकाराचे 8 नॅपकीनचे पाकीट पाच रुपयांना देण्यात येत आहे. महिलांसाठी 240 मि.मी. व 280 मि.मी. आकारातील नॅपकीन अनुक्रमे 24 व 29 रुपयांना मिळणार आहे. या सॅनिटरी नॅपकीनसाठी बचत गटांना शासनाकडून प्रति पाकीट 15 रुपये 20 पैसे अनुदान मिळणार आहे. 
मुलींसाठी शाळांवर जबाबदारी
जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील मुलींसाठी ही योजना प्राथमिक शिक्षण विभागाच्या मदतीने राबविण्यात येत आहे. यासाठी मागणी नोंदविलेल्या मुलींच्या नावांची यादी मुख्याध्यापकांमार्फत ग्रामपंचायतीच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात जमा करण्यात येत आहे. नोंदणी झालेल्या मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येत आहे. 
महिलांसाठी बचत गटांवर जबाबदारी
ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याची जबाबदारी ‘उमेद’ पुरस्कृत स्वयंसहायता बचत गटांवर देण्यात आली आहे. महिलांच्या मागणीनुसार बचत गट सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करीत आहेत. 
या सर्व कामकाजासाठी बचत गटांना ऑनलाईन पद्धतीने जोडण्यात आले आहे. यासाठी ‘अस्मिता मोबाईल अ‍ॅप’ विकसित करण्यात आले असून या अ‍ॅपद्वारे नोंदणी झालेल्या तसेच रकमेचा रिचार्ज केलेल्या गटांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या ‘उमेद जिल्हा अभियान कक्षा’द्वारे नॅपकीनचे वितरण करण्यात येत आहे. जिल्हा कार्यालयाकडून याचे संचलन करण्यात येत आहे. 
तांत्रिक अडचणींचा सामना
ही योजना राबविताना बचत गटांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘अस्मिता मोबाईल अ‍ॅप’वर सॅनिटरी नॅपकीनची नोंदणी करताना ओटीपी क्रमांक (वन टाईम पासवर्ड) प्राप्त होत नसल्याने नोंदणी करताना अडथळे येत आहेत. 
परिणामी अनेक बचत गटांची नोंदणी प्राप्त होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक (माहिती प्रणाली व तंत्रज्ञान) अमोल शिरसाट यांनी दिली.