Sun, Jul 21, 2019 12:03होमपेज › Solapur › अबब...15 दिवसांत सर्पदंशाचे 50 रुग्ण

अबब...15 दिवसांत सर्पदंशाचे 50 रुग्ण

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 10:27PMसोलापूर : दीपक होमकर

गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे सापाच्या बिळात आणि वारुळात पाणी गेल्याने साप  बीळ सोडून बाहेर पडले असून घरातील अडगळीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या पंधरा दिवसांत येथील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे तब्बल 50 हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. कालपरवा पाऊस नसतानाही एका दिवसात सर्पदंशाचे सहा रुग्ण दाखल झाले होते. त्यामुळे पावसाळ्यात सापांपासून सावधान राहण्याचा इशारा सर्पमित्र आणि डॉक्टरांनी दिला आहे.

माळरानातील जमिनीच्या बिळामध्ये साप लपलेले असतात. मात्र, पावसाचे पाणी गेल्याने ते बिळातून बाहेर पडतात आणि किचकिच पाण्यापासून  थोडी ऊब मिळावी म्हणून घरातील अडगळीच्या ठिकाणी आणि अंथरुणातसुद्धा पोहोचत आहेत. त्यामुळे शेतात काम करत असताना सर्पदंशाचे जसे अनेक रुग्ण आहेत, तितकेच रुग्ण घरात काम करत असताना, अंथरुणात झोपलेले असताना साप चावल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, विषारी सापावरही अगदी रामबाण उपाय सर्व शासकीय रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषधोपचार मोफत असल्याने सर्पदंशाने एकाचाही बळी गेला नाही. त्यामुळे सर्पदंश झालाच तर तातडीने रुग्णालयात न्यावे, असे आवाहन डॉक्टर आणि सर्पामित्रांनी केले आहे.
साप चावल्यावर हे करा साप चावल्यावर ती जखम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी, अर्ध्या-एक तासाच्याआत जवळच्या रुग्णालयात त्याला दाखल करावे, रुग्णाला शक्यतो झोपवून ठेवावे, त्यामुळे रक्‍ताभिसरण मंदावते आणि विष भिनण्यास उशीर लागतो, रुग्णाची भीती घालविण्यासाठी अर्धा कप चहा-पाणी करून त्याला धीर द्यावा.

साप चावल्यावर हे करू नका

साप चावल्याच्या ठिकाणी ब्लेड मारू नका, साप चावल्याच्या ठिकाणाजवळ गच्च दोरी वा कापडाने बांधू नका, बुवा, महाराजांकडे उपचार करण्यात वेळ वाया घालवू नका, कोणता साप चावला ते शोधून त्याला मारून ते डॉक्टरांपर्यंत नेण्याचा अट्टाहास नको, घरगुती उपाय करण्यात वेळ वाया घालवू नका.

उपचारांपेक्षा काळजी घेणेच सर्वोत्तम 

रानात कडबा उचलताना वा घरात अडगळीच्या ठिकाणी हात घालताना आधी त्यावेळी काठी मारून थोडा आवाज आणि व्हायब्रेट करावे म्हणजे साप असल्यास तो चटकन बाहेर पडेल. शक्यतो जमिनीवर न झोपता पलंगावर झोपावे किंवा जमिनीवर झोपावे लागत असल्यास रॉकेलच्या बोळ्याने सभोवताली रेषा ओढून घ्यावी. भिंतीला चिकटून झोपू नये वा खूप वेळ बसू नये, थोडी जागा ठेवून वा मध्यभागी झोपावे वा बसावे, बुट घालताना आधी ते तपासून मगच त्यात पाय घालावा.

विषारी साप चावल्याची लक्षणे अशी 

 विषारी साप चावल्यावर तेथे सूज यायला लागते व ती अर्धा एक तासात वाढत जाते. नाग, मण्यार सारख्या अतीविषारी सापाने दंश केल्यावर अधिक विष सोडले असेल तर मेंदूपर्यंत विष जाण्याची शक्यता असते. त्यामध्ये श्‍वास घेण्यास त्रास होतो, चक्‍कर यायला लागते. मात्र ही प्रक्रियाही सुमारे अर्धा एक तासाने सुरू होते.

शासकीय रुग्णालयात सर्पदंशामुळे येणारे 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांना बिनविषारी सर्पदंश झालेला आहे. विषारी सर्पदंश जरी झाला तरी तासाभरात ते रुग्णालयात आले तरी त्यांचे प्राण वाचतात, इतके प्रभावी इंजेक्शन प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे 98 टक्के रुग्ण हे बरे होऊन जातात. 
- डॉ. विठ्ठल धडके (मेडिसीन विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय)

सोलापूर व आजुबाजूच्या जिल्ह्यातील माळरानात नाग, घोणस, फुरसे, मण्यार हे विषारी साप आढळतात. हे साप चावले तरी ते विष सोडतीलच असे नाही. बहुतांश वेळा ते नुसता चावा घेतात. अगदीच त्याला डिवचून पकडण्याचा प्रयत्न केला व त्यांना जिवाची भीती वाटली तरचं ते चावल्यावर विषही सोडतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता रुग्णालयात तातडीने उपचार घ्यावेत. विशेष म्हणजे चावलेल्या सापाला शोधून मारत बसण्यात वेळ वाया घालवू नये. 
- भरत छेडा, पप्पू जमादार (नेचर कॉन्जर्व्हेशन, सोलापूर)