Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Solapur › एमपीडीएत सोलापूर टॉप थ्रीमध्ये

एमपीडीएत सोलापूर टॉप थ्रीमध्ये

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:37PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

चालू   वर्षामध्ये   सोलापूर   शहरातील 13 अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून राज्यात या कारवाईमध्ये सोलापूर शहर आयुक्‍तालयाचा तिसरा क्रमांक लागत असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी दिली. एमपीडीएमध्ये राज्यात नागपूर व पुणे येथे जास्त कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयात दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्‍त तांबडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील उपस्थित होते. 

सन 2016 च्या तुलनेत सन 2017 मध्ये आयुक्‍तालयामध्ये 387 गुन्ह्यांनी वाढ झाली असून चोरीच्या गुन्ह्यांमध्ये 106 ने वाढ झाली आहे. मोबाईल चोरीचे गुन्हे हे चोरीच्या प्रकारात दाखल करण्यात येत  असल्याने ही संख्या वाढली आहे तसेच ठकवणुकीच्या गुन्ह्यात 44 ने वाढ झाली असून ठकवणुकीची तक्रार आली की गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात निम्म्याने कमी आली असून घरफोडीचेही गुन्हे कमी झाले आहेत. दुचाकी चोरी, खून, खुनाचा  प्रयत्न, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कमी आली आहे. दारुबंदी आणि जुगाराच्या कारवाया  वाढल्याने  या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
चालू वर्षात शहरातील सुमारे 2 हजारजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात    आली   असून  आयुक्‍तालयाच्या इतिहासात  पहिल्यांदाच  जुगार व मटका घेणार्‍यांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई करीत 7 टोळ्यांमधील 65 जणांना तडीपार करण्यात आले. चालू वर्षात शहरातील 99 जणांना तडीपार करण्यात आले. दारूधंदा करणार्‍या 253 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच चालू वर्षात 23890 जणांवर समन्सची, तर 5857 जणांवर वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून 1344 वॉरंटची बजावणी केली आहे. चालू वर्षात फरारी असलेल्या 46 आरोपींना, तर पाहिजे असलेल्या 150 जणांना अटक करण्यात आली.

शहर वाहतूक शाखेकडून चालू वर्षात सुमारे 90 हजार वाहनधारकांवर कारवाई करुन 2 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  शहर   गुन्हे  शाखेकडून  चालू वर्षात 106 गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये 87 आरोपींना अटक करुन 94 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 12.61 ग्रॅम सोने, 1070 ग्रॅम चांदी, 82 दुचाकी, 85 मोबाईल, 6 गावठी कट्टे, 14 पिस्टलचा समावेश आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे 63 गुन्हे तपासासाठी आले असून त्यापैकी 28 गुन्हे उघडकीस आणून त्यातील 11 मुली व 17 मुले शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ऑपरेशन मुस्कानअंतर्गत 168 मुले-मुली शोधण्यात आली. महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे 720 तक्रारी अर्ज आले असून त्यापैकी 517 अर्जांमध्ये दोन्ही बाजूंचे समुपदेशन करुन अनेकांचे संसार वाचविण्यात पोलिसांना यश आले. 

सायबर सेलकडे 42 तक्रारी अर्ज आले. त्यौपैकी 23 अर्जांमध्ये 2 लाख 73 हजार रुपये नागरिकांना परत मिळवून देण्यात आले तसेच 350 तक्रार मोबाईल गहाळच्या आल्या. त्यामध्ये 115 मोबाईल शोधून परत करण्यात आले. बनावट फेसबुक अकौंटच्या 28 तक्रारी आल्या. त्यापैकी 14 जणांची नावे निष्पन्न करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असलेल्या 24 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे तपासावर असून उर्वरित गुन्ह्यांचे दोषारोपपत्र पाठवून देण्यात आले आहे. एमपीआयडी कायद्यांतर्गत 4 गुन्हे दाखल असून यातील गुंतवणुकदारांना लवकरच त्यांच्या रकमा परत मिळू शकतील. गेल्या 5 वर्षांत प्रलंबित राहिलेल्या सुमारे 5500 गुन्ह्यांपैकी 5 हजार गुन्ह्यांचा निपटारा सहायक पोलिस आयुक्‍त संजय भांबुरे व त्यांच्या पथकांकडून करण्यात आला आहे. उर्वरित गुन्ह्यांचा निपटाराही लवकरच करण्यात येईल, असेही आयुक्‍त तांबडे यांनी सांगितले.