Fri, Jul 19, 2019 18:46होमपेज › Solapur › ऐन सुट्टीत एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांनाही सुट्टी!

ऐन सुट्टीत एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांनाही सुट्टी!

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 10:47PMसोलापूर : प्रतिनिधी

 ऐन सुट्टीच्या काळात इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे पॅसेंजर आदी गाड्यांना  इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचा ब्रेक दिल्याने प्रवाशांत संतापाची लाट पसरत आहेत. तब्बल चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंद्रायणी एक्स्प्रेस एक महिन्याच्या आत पुन्हा पंधरा दिवसांसाठी बंद झाली आहे.

माढा ते वाकाव यादरम्यान दुहेरीकरणाचे कार्य हाती घेतल्याने इंद्रायणीला एक्स्प्रेस, पुणे पॅसेंजर, सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-मिरज या गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. उद्यान एक्स्प्रेससारख्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांना बेळगावपासून वळविण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकातून उद्यान एक्स्प्रेसने सोलापूर स्थानकाला येणार्‍या प्रवाशांचेदेखील मोठे हाल होत आहेत.

माढा  ते वाकाव यादरम्यान मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. यापूर्वी जेऊर ते वाशिंबे मार्गावर रुळाखालील खडी बदलण्याच्या कार्यामुळे 1 नोव्हेंबर 2017 ते ते 6 मार्च 2018 याकाळात सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे पॅसेंजर एक्स्प्रेस चार महिने रद्द केल्या होत्या. 31 मार्च रोजी रात्री सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी रद्द केल्याचे अनेक प्रवाशांना माहितीच नव्हते. यामध्ये अनेक ज्येष्ठ प्रवासी होते. रेल्वे प्रवासी संघटनेने काही प्रवाशांची सोय करुन देण्याचा प्रयत्न केला होता. अनेक प्रवासी ताटकळत प्लॅटफॉर्मवर उभे होते. परंतु रेल्वे प्रशासनाचा एकही अधिकारी रद्द झालेल्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांची सोय करताना दिसून आला नाही.