Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Solapur › आष्टीत फटाक्यांच्या स्फोटात तिघे ठार

आष्टीत फटाक्यांच्या स्फोटात तिघे ठार

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 10:56PMआष्टी : प्रतिनिधी

आष्टी शहरातील शेकापूर रोडवरील दारूगल्ली येथील एका फटाके व्यापार्‍याच्या घरात शुुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास फटाक्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात घराचा स्लॅबही पडला. लग्‍न समारंभ, यात्रा यामुळे घरात फटाक्यांचा मोठा साठा होता. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास फटाक्यांचा बार होत होता. या घटनेत फटाके व्यापार्‍यांसह तिघे ठार झाले आहेत. 

आष्टी शहरातील दारूगल्ली येथील सरफराज अल्लाउद्दीन सय्यद (वय 38) हे शोभेच्या दारूचा व्यवसाय करतात. सध्या लग्‍नसराई व गावोगावच्या यात्रा असल्याने त्यांनी शोभेची दारू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणली होती. शुुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक त्यांच्या घरात या शोभेच्या दारूचा स्फोट झाला. हा स्फोट कशाने झाला; हे मात्र कळू शकले नाही. 

सुरुवातीला थोडे-थोडे फटाके वाजले, तेव्हा हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. मात्र, यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला. हा स्फोट प्रचंड असल्याने सर्वच भयभीत झाले होते. या स्फोटात सरफराज यांच्या घराचा स्लॅब पडला. यावेळी घरामध्ये असलेले सरफराज अल्लाउद्दीन सय्यद त्यांच्या आई हर्जना बेगम सय्यद अलाउद्दीन (वय  60) व सरफराज यांचे भाचे फैजल (वय 14) यांचा या घटनेत मृत्यू झाला. फैैजल हा अहमदनगर येथील असून तो उन्हाळी सुट्ट्यांमुळे मामाकडे आला होता.

या घटनेनंतर धुराचे प्रचंड लोट उडाले होते. सतत अर्धा ते पाऊण तास फटाक्यांचा बार होत असल्याने नागरिकांनी या घटनास्थळाकडे धाव घेतली. शेजारच्या लोकांनी व इतर काही नागरिकांनी पाणी ओतून आग विझविण्याचा प्र्रयत्न केला. मात्र, आग अटोक्याबाहेर होती. यानंतर जामखेड येथून अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास प्र्रयत्न करून आग अटोक्यात आणली. याच दरम्यान, आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद शौकत अली व त्यांच्या स्टाफने घटनास्थळी धाव घेऊन इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगत आग अटोक्यात आणण्याचे काम केले.

सुरेश धस यांनी केला फोन

आष्टी येथील दारूगल्लीमध्ये भिषण आग लागल्याची माहिती काही वेळातच माजी मंत्री सुरेश धस यांना नागरिकांनी दिली. सुरेश धस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जामखेड येथील अग्निशमन दलाची गाडी बोलाविली. ही गाडी वेळेत आल्याने आग आटोक्यात आणण्यात मदत झाली.

आष्टी नगरपंचायतला नाही गाडी

आष्टी येथे नगरपंचायत आहे. आष्टी तालुका असून व्यापारपेठेचे गाव आहे. तालुक्यासह येथे आगीच्या घटना घडत असतात. अशावेळी  अग्निशमन गाडीची उणीव भासते. आष्टी येथे एक गाडी असावी, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, येथे अद्याप एकही गाडी नाही. येथे अग्निशमन गाडी असती तर घटना आणखी लवकर अटोक्यात आणता आली असती, अशी प्रतिक्रिया यावेळी घटनास्थळाचे नागरिक देत होते.