Sun, Nov 18, 2018 17:37होमपेज › Solapur › माढ्यात वाळू दरोड्याचा प्रयत्न; पाचजणांना पोलिस कोठडी

माढ्यात वाळू दरोड्याचा प्रयत्न; पाचजणांना पोलिस कोठडी

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 10:39PM

बुकमार्क करा
माढा : वार्ताहर

माढा तालुक्यात सीना नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करताना तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या भरारी पथकाने कारवाई करत साडेसहा लाखांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी माढा पोलिसांत दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना माढा पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत माढा पोलिसात उंदरगाव तलाठी विवेकानंद यादव आखाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 30 डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांचे भरारी पथकातील कर्मचारी एम. डी. काळे, पी. एच. माने, एन. बी. मुरकुटे, एस. एम. इंगोले, आर. ई. चव्हाण, सी. के. नावडे हे खैराव या गावात उपस्थित होते. त्यांना गुप्त खबरीमार्फत खैराव येथील सीना नदीपात्रात गट नंबर 362 लगत अवैध वाळू उपसा होत असल्याची खबर मिळाली. पोलिसांना याबाबत भरारी पथकाने सूचना केली. पोलिस कर्मचार्‍यांसह भरारी पथकाने नदीपात्रात छापा टाकला. यावेळी नदीपात्रात एम.एच. 45 एस. 4861, एम. एच. 45 एफ. 6008, एम.एच. 13 ए.जे. 5010 व इतर एक ट्रॅक्टर असे चार ट्रॅक्टर डंपिंग ट्रॉलीसह वाळू उत्खनन करत असल्याचे आढळले. यावेळी एक ट्रॅक्टर ड्रायव्हर व दोन- तीन मजूर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.  ज्ञानेश्‍वर विश्‍वनाथ सिरसट, शुभम विठ्ठल बेडगे, अविनाश उर्फ पप्पू हनुमंत कदम, सर्व रा. मानेगाव व ज्ञानेश्वर कल्याण पाटील, गणेश नारायण मोटे दोघेही रा. खैराव अशा पाचजणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह असा सहा लाखांचा, तर दोन ब्रास वाळू वीस हजार रुपये किंमतीची असा एकूण सहा लाख वीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि अतुल भोस हे करीत आहेत.