Wed, Apr 24, 2019 20:18होमपेज › Solapur › राजकीय दबाव झुगारून अवैध बांधकाम पाडले

राजकीय दबाव झुगारून अवैध बांधकाम पाडले

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:30PMसोलापूर ः प्रतिनिधी

महापालिकेच्यावतीने मंगळवारी रेल्वेलाईन्स भागातील अवैध बांधकाम पाडताना राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र हा दबाव झुगारत मनपाने हे बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई पूर्ण केली.

गेल्या दीड महिन्यापासून शहरातील पार्किंग, फ्रंट-साईड-रेअर मार्जिनमध्ये करण्यात आलेले अवैध बांधकाम पाडून टाकण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी सकाळी रेल्वेलाईन्स भागातील बँक ऑफ इंडियानजिकच्या बाहुबली अपार्टमेंटमधील पार्किंगची जागा काबीज करुन उभारलेले गोडावून पाडण्यासाठी महापालिकेचे पथक धडकले. हे बांधकाम पाडण्याची नोटीस देऊनही प्रीतम शहा यांनी हे बांधकाम पाडले नव्हते. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू असताना हे बांधकाम पाडू नये याकरिता राजकीय दबाव आला. यामुळे कारवाईत व्यत्यय आला. या दबावावत मात करीत मनपाच्या पथकाने हे अवैध बांधकाम जमीनदोस्त केले. 

रेल्वेलाईन्स भागात कारवाई करताना राजकीय दबावाला सामोरे जावे लागलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चक्क त्यांच्या कार्यालयातच अन्य अवैध बांधकाम प्रकरणी एका संघटनेच्या पदाधिकार्‍याच्या हुज्जतीचा सामना करावा लागला. जुळे सोलापूर म्हाडा कॉलनीमधील एक अवैध बांधकाम मनपाने नियमित करु नये, असे या पदाधिकार्‍याचे म्हणणे होते. यावरुन त्याने बांधकाम विभागाच्या कार्यालयात गदारोळ केला. नियमित करण्याची बाब ही नियमाला अनुसरुनच असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न अधिकार्‍यांनी केला. मात्र ‘त्या’ पदाधिकार्‍याचे समाधान झाले नाही. 
दरम्यान, मनपाची ही मोहीम निरंतर सुरू राहणार आहे. आतापर्यंत 346 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून एकूण 77 मिळकतींमधील अवैध बांधकाम  पाडून टाकण्यात आले. स्वत:हून 48 जणांनी बांधकाम पाडून टाकले, तर मनपाने 28 मिळकतींमधील अवैध बांधकाम जमीनदोस्त केले.