Wed, Jul 17, 2019 10:02होमपेज › Solapur › अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:37PMसांगोला : तालूका प्रतिनिधी   

 अनैतिक संबंधास अडथळा ठरू लागलेल्या पतीचा अपघाताचा बनाव करीत पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला आहे. ही घटना 5 ऑगष्ट रोजी गौडवाडी (ता. सांगोला) येथील बुद्धेहाळ तलावाच्या सांडव्याजवळ घडली होती. याबाबत पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत आरोपी पत्नी, प्रियकर व त्याचा सहकारी असे तिघांना जेरबंद केले आहे. शुक्रवार दि. 17 ऑगष्ट रोजी संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून पतीपत्नीच्या नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना उघडकी आणल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विलास शेटे (वय 48, रा. कोळा) यांना 5 ऑगष्ट रोजी गौडवाडी येथील बद्धेहाळ तलावाच्या सांडव्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला अशी फिर्याद सांगोला पोलिसात दाखल करण्यात आली होती. परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयताचा भाऊ भारत शेटे यांनी व्यक्‍त करीत या गुन्ह्याची सखोल चौकशीची मागणी केली होती. त्याप्रमाणे या गुन्ह्याचा तपास ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राजकुमार केंद्रे व स.पो.नि. अमुल कादबाने यांनी केला. आणि अवघ्या 10 दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला. 

 मयत विलास याची पत्नी सारिका हिचे गावातील सायाप्पा सरगर याचे बरोबर अनैतिक संबंध होते. यामुळे त्या पती पत्नीत वाद होत होता. विलास हा पत्नीला अनैतिक संबंध बंद करण्याबाबत वारंवार सांगूनदेखील सारिका ऐकत नसल्याने त्यांच्यातील भांडण वाढत गेले. सारिका हिला अनैतिक संबंधात पतीचा अडसर होऊ लागल्याने तिने आपला प्रियकर सायाप्पा व त्याचा जोडीदार समाधान करचे यांच्या मदतीने विलास याला संपविण्याचा कट रचला. आणि 5 ऑगष्ट रोजी सारिका हिने प्रियकाराच्या मदतीने विलास हा त्याच्या गाडीवरून जात असताना त्याच्या अंगावर वाहन घालून त्याचा खून केला. व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव केला. त्यानंतर पोनि राजकुमार केंद्रे व सपोनि अमुल कादबाने यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत हा गुन्हा उघडकीस आणला. संशयित आरोपी पत्नी सारिका, सायाप्पा व समाधान यांना जेरबंद करून अधिक तपास करीत पोलिसी खाक्या  दाखविताच आरोपींनी विलास याचा खून केल्याचे कबूल केले. 

सदर गुन्हा हा अनैतिक संबंधातून झाला असून या गुन्ह्यात अजूनही आरोपी असतील तर त्यांची नावे तपासात निष्पन्न होणार आहेत. संशयित आरोपींवर भादविक कलम 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.