होमपेज › Solapur › पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अकलूजकरांचे लाक्षणिक उपोषण

पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अकलूजकरांचे लाक्षणिक उपोषण

Published On: Jun 18 2018 6:50PM | Last Updated: Jun 18 2018 7:51PMअकलूज : वार्ताहर

येथील सुमारे साडेतेरा कोटी रुपयांच्या सुधारित व विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे काम गेली पाच वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण झाले नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही ते काम सुरूही केले जात नाही. त्यामुळे अखेर अकलूजबरोबरच यशवंतनगर व संग्रामनगर येथील ग्रामस्थांनी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक उपोषण केले.

या पाणीपुरवठा योजनेला दि.28 नोव्हेंबर 2013 रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यानुसार या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, गेली दीड वर्षापासून हे काम काही शेतकर्‍यांनी हरकत घेतल्याने बंद आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही काम केले जात नाही. त्यामुळे या तीन गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यात उपजिल्हाधिकारी यांनी हे काम 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण तर सोडाच, पण सुरूही केले नाही. या पार्श्‍वभूमीवर हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी आ. हणमंत डोळस, माजी जि. प. गटनेते धैर्यशील मोहिते-पाटील, जि. प. सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, शशिकला भरते, विठ्ठल गायकवाड, दादा मोरे, नंदू रास्ते, संग्रामनगरचे सरपंच राजवर्धिनी माने-पाटील, यशवंतनगरच्या सरपंच देवीश्री मोहिते-पाटील, पं. स. सदस्या अ‍ॅड. हसीना शेख, रत्नाकर सरताळे आदी उपस्थित होते. या प्रश्‍नावर आ. हणमंत डोळस यांनी येत्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगितले.