Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Solapur › मोहोळ बंदला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद 

मोहोळ बंदला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद 

Published On: Aug 09 2018 4:36PM | Last Updated: Aug 09 2018 4:36PMमोहोळ : वार्ताहर 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या धर्तीवर मोहोळ शहर व तालुक्यात शंभर टक्के बंद यशस्वी झाला. मोहोळ शहरात व्यापारी बांधवांनी स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. 

मोहोळ तहसील कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करुन भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होत्या.
सारोळे, खवणी व पोखरापूर गावात आंदोलकांनी मोहोळ पंढरपूर मार्गावर टायर पेटवले तर, चिखली, हिवरे येथील आंदोलकांनी सोलापूर-पुणे महामार्ग रोखून धरला. याशिवाय पेनूर, पाटकूल, टाकळी सिकंदर, औंढी, सौंदणे, अंकोली, अनगर, लांबोटी, शेटफळ, देवडी, पापरी, आष्टी या गावांमध्ये देखील दुकाने व बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. मात्र, संपूर्ण तालुक्यात अत्यावश्यक सेवा सुरु होत्या तर, काही शिक्षण संस्थाना सुट्टी देण्यात आली होती.
बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नुतन पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक  सोनकांबळे, पोलिस उपनिरीक्षक मुजावर, पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.