Wed, Jul 24, 2019 05:41होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यातील शाळा शंभर टक्के बंद

पंढरपूर तालुक्यातील शाळा शंभर टक्के बंद

Published On: Aug 08 2018 10:31PM | Last Updated: Aug 08 2018 10:06PMपंढरपूर : प्रतिनिधी 

राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी तीन दिवसांचा संप पुकारला असून या संपामध्ये पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनीही सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शाळांना कुलूपे लागली आहेत आणि शाळकरी मुले सुटीचा आनंद लुटत आहेत. 

राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी 7 वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, जानेवारी 2018 पासून महागाई भत्ता देण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजना  रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, महागाई भत्त्याची 14 महिन्यांची थकबाकी जमा करावी, 6 व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, अत्यल्प मानधनावरील शिक्षणसेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक नियुक्त करावेत,  सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, सर्व विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी  विनाअट  पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिलेल्या सर्व प्रकारच्या कार्यालयीन, प्रशासनिक ऑनलाईन कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, यासाठी समूह साधन केंद्र स्तरावर संगणक सुविधा देऊन डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना इयत्ता पाचवी आणि आठवीचा वर्ग जोडण्यास    प्रशासनाकडून निर्माण केले जाणारे अडसर दूर करावेत, कमी पटाच्या नावाखाली बंद केलेल्या (कथित समायोजन केलेल्या) स्थानिक स्वराज्य   संस्थांच्या सर्व  शाळा पुन्हा सुरु कराव्यात आणि कमी पटाच्या नावाखाली कोणतीच शाळा बंद  करू नये, शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापक, शिक्षकांना मुक्त करावे,  शासनाचे विविध विभाग आणि उपक्रमांचे कंत्राटीकरण, खासगीकरण बंद करावे, प्राथमिक शाळांमध्ये केवळ एकच शाळा व्यवस्थापन समितीच असावी, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळांच्या शिक्षक वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक स्थापन करावे अशा स्वरूपाच्या सुमारे 30 मागण्या करून पंढरपूर तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. 

या संपामध्ये शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघ, शिक्षक समिती, दोन्ही शिक्षक, पदवीधर शिक्षक संघटना आदी सर्वच शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला असल्यामुळे तालुक्यातील शंभर टक्के शाळांना तीन दिवसांची सुटी मिळाली आहे.  या संपामुळे एरवी चिमुकल्यांच्या गलक्याने गजबजलेल्या शाळा आणि शाळांची आवारे ओस पडली असल्याचे दिसत आहेत. संपाचा बुधवार दुसरा दिवस असून आज (गुरूवारी) तिसर्‍या दिवशीही संप सुरूच राहणार असल्यामुळे जि.प.च्या शाळांना सुटी जाहीर केल्याचे शिक्षण संघटनांकडून सांगितले जाते. 

दरम्यान, शाळांना 3 दिवसांची सुटी मिळाल्यामुळे बालगोपाळांनी आपल्या सवंगड्यांसह खेळाची धमाल उडवून दिलेली आहे. 

1031 पैकी 997 शिक्षकांचा संपात सहभाग
 7, 8 आणि 9 ऑगस्ट या तीन दिवसांच्या राज्यव्यापी संपामध्ये सर्वच शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील 1031 शिक्षकांपैकी 997 शिक्षक या संपात सहभागी आहेत. केवळ 22 शिक्षक सहभागी नाहीत, तर 12 शिक्षक यापूर्वीच दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले आहेत. सर्व केंद्रप्रमुखही या संपात सहभागी झालेले आहेत.