होमपेज › Solapur › पंढरपूरमध्ये कडकडीत बंद, रस्त्यावर एकही वाहन नाही (व्हिडिओ)

पंढरपूरमध्ये कडकडीत बंद, रस्त्यावर एकही वाहन नाही (व्हिडिओ)

Published On: Aug 09 2018 8:31PM | Last Updated: Aug 09 2018 8:31PMपंढरपूर : प्रतिनिधी 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेले चक्का जाम आंदोलन आणि पंढरपूर बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण पंढरपूर शहर शंभर टक्के बंद होते. पंढरपूर तालुक्यातील रस्त्यावरून एकही वाहन दिवसभर चालले नाही. तालुक्यातील सर्वच्या सर्व रस्ते आंदोलकांनी अडवून धरल्यामुळे एरव्ही भरधाव वाहणारे रस्ते गुरूवारी निपचीत पडून होते. आंदोलकांनी रस्ते रोखून धरताना रूग्णवाहिका, आजारी रूग्णांना सोडून शिस्त आणि माणूसकी दाखवून दिली आहे. बंद शांततेत संपन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेला चक्का जाम पंढरपूर शहर आणि तालुक्यात सर्वत्र शांततेत संपन्न झाला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे शंभर टक्के कडकडीत बंद पंढरीत पहिल्यांदाच झालेला आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मल्टीप्लेक्स,  दुकाने, एस.टी. वाहतूक पूर्णपणे बंद राहिली आहे. त्यामुळे एरव्ही शेकडो बसेस आणि हजारो प्रवाशांनी गजबजलेले बसस्थान अक्षरश: निर्मनुष्य झाले होते. पंढरीतील सर्वच गर्दीचे चौक, रस्ते ओस पडलेले होते.  शहरात बंदचा फटका सर्कशीलाही बसला असून, सर्कसचे दिवसभरात सर्व खेळ रद्द केल्यामुळे कलाकारांनी दिवभर क्रिकेट आणि इतर खेळ खेळून दिवस काढला. शहरातील काही भागात आंदोलकांनी टायर्स जाळून शासनाचा निषेध केला. सकाळी ९ वाजता पंढरपूर शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून नागरिकांना बंदचे आवाहन केले. शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचे बुधवारीच जाहीर झाल्यामुळे एकेही शाळा, महाविद्यालय सुरू झाले नव्हते. सर्व शासकीय कार्यालये, बँकाही गुरूवारी बंद होत्या. संपूर्ण दिवसभरात पंढरपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.  

  तालक्याच्या ग्रामीण भागात सर्वच गावांनी चक्का जाम आंदोलनात भाग घेतल्यामुळे  जनजीवन ठप्प झाल्याचे दिसून आले.  प्रत्येक गावातील नागरिक सकाळी ९ वाजल्यापासून रस्त्यावर बसल्यामुळे तालुक्यातून एकही वाहन बाहेर गेले नाही आणि बाहेरून वाहन शहरात आलेले नाही. रस्त्यावर दिवसभर ठिय्या आंदोलन केल्यामुळे संपूर्ण  तालुक्यातील रस्त्यांवर शूकशूकाट पसरल्याचे दिसून आले. तालुक्यातील करकंब, पिराची कुरोली, भाळवणी, चळे, रांझणी, गोपाळपूर, खर्डी, सुस्ते, तूंगत, तारापूर, वाखरी, बाजीराव विहीर, कोर्टी, सिद्देवाडी, एकलासपूर, ओझेवाडी, वाडी कुरोली, भंडिशेगाव, उपरी, गार्डी, अनवली, देगाव, शेगाव दुमाला, गुरसाळे, भोसे, आढीव, बाभुळगाव, रोपळे आदी सर्वच गावांतून आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडले.

रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखली
दरम्यान, पंढरपूर शहरातील आंदोलकांनी पंढरपूर रेल्वे स्थानकावर जाऊन सायंकाळी ६ वाजता सुटणारी रेल्वे अडवून धरली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून रेल्वे स्थानक दणाणून सोडले होते.