Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Solapur › जिल्हाभरात चक्‍काजाम, मूकमोर्चे!

जिल्हाभरात चक्‍काजाम, मूकमोर्चे!

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी शहर व जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. सोलापूर मराठा क्रांती मोर्चातर्फे जुना पुणे नाका येथे चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज संघटनेतर्फे येथील जिल्हा परिषद गेटसमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत बलिदान दिलेल्या लोकांना समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हाभरात सर्वत्र ही आंदोलने झाली. 

चक्‍काजाम आंदोलन
शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे जुना पुणे नाका येथे चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास जुना पुणे नाका येथे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जमले. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी आसमंत दणाणला. 

मराठा आरक्षण मोर्चाचे बॅनर घेऊन आंदोलकांनी छत्रपती शंभूराजेंच्या पुतळा सर्कलला दोन प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर पुतळ्याच्या चौथर्‍याजवळ येऊन जिजाऊ वंदना प्रार्थना करण्यात  आली आणि मग रस्त्याच्या मध्यभागी बसत आंदोलन सुरू झाले. पुणे महामार्गावरून सोलापुरात प्रवेश करणारा मार्ग पोलिसांनी पुलाच्या वरच्या बाजूलाच अडविला, तर सोलापुरातून पुणे महामार्गाला जोडणारा मार्ग हॉटेल अ‍ॅम्बॅसॅडर येथेच अडवून त्यांना पर्यायी मार्ग दिला. त्यामुळे चक्‍काजाम, रास्ता रोको आंदोलनाच्या काळात दुचाकी वाहनेसुद्धा छत्रपती संभाजीराजे पुतळ्याच्या चौकात येऊ शकली नाहीत. 

मूक आंदोलन
सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद गेटसमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत बलिदान दिलेल्या लोकांना समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मूक आंदोलनाला बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर, सुरेश गायकवाड, संतोष पाटील, जयदीप माने, आसिफ शेख यांनी निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला.

हुल्लजबाजांकडून किरकोळ दगडफेक
छत्रपती संभाजी महाराज चौकातील ठिय्या आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर परतताना काही हुल्लडबाजांनी नवी पेठेतील व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांच्या दुकानावर दगडफेक केली. नवी पेठेतील जीवनदीप ट्रॅव्हल्सच्या बाजूला असलेल्या अशोक मुळीक यांच्या दुकानावर अज्ञातांनी दगडफेक केली. यात दुकानाच्या काचांना तडा गेला, तर काही काचा फुटल्या. ही बातमी वार्‍यासारखी शहरात पसरली. घटना कळताच त्वरित पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, संजय जगताप पथक, कमांडोसह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
गुरुवारच्या ठिय्या आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताचा मोठा ताण आला होता. मात्र, मराठा समाज बांधवांनी शांततेत आंदोलन केल्याने किरकोळ घटना वगळता आंदोलन शांततेत झाले. सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच संभाजी चौक, शिवाजी चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कमांडोसह अश्रुधुराची नळकांडी फोडणारे, अग्‍निशमक दल, कमांडोज तैनात केले होते. पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त  अभय डोंगरे, दीपाली काळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक संजय जगताप बंदोबस्तावर नजर ठेवून सूचना देत होते.

संभाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर गर्दी जमत गेल्यानंतर पुणे रस्त्यावरून शहरात येणारी वाहतूक बंद करून रुपाभवानी मंदिरापासून आणि सम्राट चौकातून वाहतूक वळविण्यात आली. कोंडीत जवळपास 200 मराठा समाजबांधवांनी शेती अवजारे, बैलगाड्या लावून  अर्धा तास रास्ता रोको केला. बाळे पोलिस चौकी, फौजदार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलकांना हटवून रस्ता मोकळा केला.

मोहोळमध्ये शंभर टक्के बंद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या धर्तीवर मोहोळ शहर व तालुक्यात शंभर टक्के बंद यशस्वी झाला. मोहोळ शहरात व्यापारीबांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षणास पाठिंबा दिल्याने सामाजिक एकतेचे दर्शन घडले.

कुर्डुवाडीत कडकडीत बंद
सकल मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्याच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला प्रतिसाद देत कुर्डुवाडी शहर व परिसरातील सर्वच ठिकाणी कडेकोट  बंद पाळण्यात आला. गुरुवारचा साप्ताहिक बाजार असूनही बाजार समिती, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्यासह शहरातील अत्यावशक सेवा सोडून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदबाबत 8 रोजी सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते.