Thu, Apr 25, 2019 15:57होमपेज › Solapur › घरकुल अनुदान लाटले मात्र घरे नाहीत

घरकुल अनुदान लाटले मात्र घरे नाहीत

Published On: Jun 25 2018 1:54AM | Last Updated: Jun 24 2018 8:38PMमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे

महाराष्ट्र शासनाने गोरगरिबांना निवारा मिळावा या उद्देशाने रमाई व प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली. दरम्यान घरकुल योजनेचे अनुदान उचलले जाते. मात्र घरकुले पुर्ण केली जात नसल्याचा प्रकार मंगळवेढा तालुक्यात उघड झाला असून प्रशासन याबाबत हतबल झाल्याने घरकुल धारकाने अनुदान उचलुनही पुर्ण केले नाही. अशा घरकुल धारकांवर पंचायत समिती प्रशासनाने अनुदान परत करा अन्यथा फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

मंगळवेढा तालुक्यात सन 2016-17 मध्ये एकुण 1286 घरकुल मंजुर आहेत. यामध्ये प्रधानमंत्री योजनेतील 131 व रमाई योजनेमधील 30 घरकुले अपुर्ण आहेत. एका घरकुलसाठी 1 लाख 10 हजार अनुदान मिळते. पहिला हप्ता 30 हजार, दुसरा हप्ता 30 हजार, तिसरा हप्ता 30 हजार व चौथा हप्ता 20 हजार असे टप्या टप्याने घरकुलाची काम पुर्ण होईल तसा निधी दिला जातो. पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकामार्फत वारंवार अपुर्ण घरकुल धारकांना घरकुले पुर्ण करण्याचा सुचना देण्यात आल्या. मात्र त्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नसल्याने आता पंचायत समितीने बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल अशी भुमिका घेतली आहे.  आंधळगाव येथील 3 व लक्ष्मी दहिवडी येथील 2 घरकुलधारकांनी काहीच बांधकाम न केल्यामुळे त्यांच्या 7/12 उतार्‍यावर बोजा चढवला आहे.

अरळी, नंदुर, डिकसळ येथील तिघा घरकुल धारकाकडुन प्रत्येकी 30 हजार रूपये वसुल करण्यात आले आहेत. सन 2017-18 प्रधानमंत्री योजनेत 681 तर रमाई योजनेत 765 घरकुल मंजुर आहेत. अपूर्ण घरकुल धारकांनी 30 जूलैअखेर घरकुल पूर्ण करण्याची सवलत देण्यात आली असुन मुदतीत न झाल्यास अनुदान पंचायत समितीकडे जमा करावे लागणार आहे . जे घरकूल लाभधारक अनुदान जमा करणार नाहीत. त्यांच्यावर फौजदारी दाखल केली जाईल असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.